मिरज पोलीस व वनविभागाची कारवाई
कराड : पुष्पा या दाक्षिणात्य चित्रपटाचा अभ्यास करून रक्तचंदनाची तस्करी करणारा टेम्पो पोलीस व वनविभागाने पकडला. यामध्ये सुमारे अडीच कोटी रुपयांचे एक टन रक्तचंदन जप्त करण्यात आले आहे. मिरज येथे ही सोमवारी ही कारवाई करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, बंगळूरहून कोल्हापूरकडे अवैधरित्या रक्तचंदनाची तस्करी होत असल्याची माहिती पोलीस व वनविभागाला मिळाल्यानंतर मिरजच्या महात्मा गांधी पोलीस चौकीचे एपीआय रवीराज फडणवीस, वनविभागाचे वनक्षेत्रपाल युवराज पाटील, वनपाल तुषार भोरे, वनरक्षक सागर सोरवट यांनी सांगलीच्या जकातनाका येथे सापळला रचला. या सापळ्यात फळ, भाजीपाला वाहूतकीचे परमीट असणारा संशयित टेम्पो पकडण्यात आला. या टेम्पोची तपासणी केली असता भाजीपाला, फळांच्या कॅरेटच्या खाली सुमारे अडीच कोटी रुपयांचे एक टन रक्तचंदन आढळून आले.
सदरच्या टेम्पो चालकास ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे तर टेम्पोतील अन्य एकास या कारवाईची माहिती अगोदरच मिळाली असल्याने तो कारवाईपूर्वीच टेम्पोतून उतरला असल्याचा संशय पोलिसांना आहे. त्याचा शोध पोलीस घेत आहे. सदरचे रक्तचंदन तामिळनाडू, कर्नाटक येथील जंगलातून आणल्याचा संशय पोलिसांना आहे.