१० लाख ३६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत
सातारा : सातारा पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेमार्फत अवैध वाळू उत्खनन व चोरटी वाहतूक करणाऱ्या तस्कराविरुद्ध पोलिसांनी मोठी कारवाई केली असून सुमारे १० लाख ३६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात अवैध वाळू उत्खनन व चोरटी वाहतूक केली जात असल्याची खात्रीलायक माहिती सातारा पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेला प्राप्त झाली होती. त्याप्रमाणे सातारा पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेतर्फे निंभोरे ते मिरगाव दरम्यान जाणाऱ्या पालखी विसावा जवळील रोडवर सापळा रचून वाहतूक करणाऱ्या वाहनावर छापा टाकून एक टाटा कंपनीचा १६१३ मॉडेलचा डंपर आणि अल्टो कारसह चोरटी वाळू जप्त करून दोन्ही इसमास आणि एका विधिसंघर्ष बालकाला ताब्यात घेऊन त्यांच्यावर फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल आणि अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे यांच्या सूचनेवरून आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या आदेशावरून सहाय्यक फौजदार दबडे, पोलीस हवालदार विश्वनाथ संकपाळ, राजकुमार ननवरे, संतोष पवार, पोलीस नाईक अमोल माने, अर्जुन शिरतोडे, स्वप्नील माने, शिवाजी भिसे, प्रमोद सावंत, अमित सपकाळ, मुनीर मुल्ला, पोलीस शिपाई प्रवीण पवार, केतन शिंदे, मोहसीन मोमीन, मयुर देशमुख यांनी केली असून पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल आणि अप्पर पोलीस अधिक्षक अजित बोऱ्हाडे यांनी सर्व टीमचे अभिनंदन केले आहे.