नागठाणे :- प्रतिनिधी
येथील सकल मराठा समाजाच्या वतीने काशीळ व गांधीनगर येथील स्वागत कमाणीत राजकीय नेत्यांना गावबंदीचे फलक लावण्यात आले आहे. त्यावेळी ‘एक मराठा लाख मराठा’ जय भवानी जय शिवाजी च्या घोषणांनी आसमंत दणाणून गेला. दरम्यान आज (रविवारी) सकाळी दहा वाजता मोटार सायकल रॅली काढण्यात येणार असल्याचे संयोजकांच्या वतीने सांगण्यात आले आहे.
मनोज जरांगे-पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी येथील मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने राजकीय नेत्यांना गावबंदीचे फलक लावण्यात आले आहेत. आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत सर्वपक्षीय नेत्यांना गावबंदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रविवारी मोटार सायकल रॅली काढून ग्रामपंचायत कार्यालया समोर साखळी उपोषण करणार असल्याचे उपसरपंच रोहन माने यांनी सांगितले. आरक्षण लवकर दिले नाही तर बेमुदत उपोषण सुरू करण्यात येणार असल्याचा इशारा शासनास देण्यात आला आहे. सर्व आंदोलने शांततेच्या मार्गाने होणार असून, कोणताही अनुचित प्रकार होणार नाही, याची दक्षता सकल मराठा समाजाच्या वतीने घेण्यात येणार आहे. दरम्यान, आजच्या साखळी उपोषणासाठी गावातील जेष्ठ नागरीक, तरूण, महिला, मुले सहभागी होणार आहेत. यावेळी बोलताना संदीप जाधव म्हणाले मनोज जरांगे-पाटील याच्या आंदोलनात आम्ही सहभागी असून आरक्षण देण्यास सरकार विलंब केल्यास बेमुदत उपोषण सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले.






















