पाडेगाव : देशात सर्वांचीच दिवाळी गोड होण्याकरिता राबणारे हात म्हणजे ऊसतोडणी कामगार. पण मैलो नी मैलो लांब आलेल्या कुटुंबाना कसली आलीय दिवाळी. ऊसतोड कामगार दिवाळी सणापासून वंचित राहू नये या करिता कै.आनंदा सुर्यवंशी चॅरिटेबल ट्रस्ट पाडेगाव व मांगल्य शिक्षण प्रसारक संस्था पुणे 28 यांच्या वतीने खंडाळा व फलटण तालुक्यातील ऊसतोड कामगारांच्या कोप्यावर व तळावर जाऊन 400 कुटुंबांना दिवाळी फराळ वाटप करण्यात आले.
लाडू, करंजी, चिवडा, चकली आदी पदार्थ स्वतःच्या घरी बनवून आमच्या कुटुंबासोबत इतर कुटुंबाची ही दिवाळी साजरी व्हावी अशी संस्था व ट्रस्टच्या अध्यक्षा चैत्राली सूर्यवंशी ,उपाध्यक्षा विमल सुर्यवंशी व सचिव पवन सूर्यवंशी यांची इच्छा होती. अध्यक्षा चैत्राली सूर्यवंशी, उपाध्यक्षा विमल सुर्यवंशी यांनी आश्रमशाळा व वसतिगृह येथील काम करणाऱ्या स्वयंपाकी यांच्या मदतीने सर्व फराळ पदार्थ घरी बनवून 400 पाकिटे पॅकिंग केली. दिवाळीच्या पहिल्या दिवस म्हणजे वसुबारस या दिवशी पाडेगाव फार्म, ता.फलटण व बाळूपाटलाचीवाडी, ता.खंडाळा या ठिकाणी उतरलेल्या तळावर जाऊन फराळाचे वाटप लोणंद येथील नगरसेवक हनुमंत शेळके व पवन सुर्यवंशी यांनी केले. यावेळी गिरीजा पोरे, राजेश खरात, ग्रामपंचायत सदस्य नितीन जगताप, पंढरीनाथ लकडे व ऊसतोड कामगार आदी उपस्थित होते.
ऊसतोड कामगार यांच्या मुलासाठी काम करणाऱ्या आशा प्रकल्प कडून समीक्षा स.मि, नवनाथ चोरमले, स्वप्नील मोहिते, वैभव थोपटे, नौशाद बागवान, भारती जाधव, विवेक बरकडे, कृष्णा पासलकर, विकास बरकडे, ट्रस्टचे सभासद सुनील भोसिकर, तानाजी खुडे, विलास सुर्यवंशी, विकास पाटोळे, संजय सुर्यवंशी, बापूराव गजले,देवराम देवचे आदी उपस्थित होते. नवनाथ चोरामले यांनी सर्वांचे स्वागत केले व आभार मानले. संस्था व ट्रस्ट यांनी मागील वर्षांपासून फराळाचे वाटप करण्याचा उपक्रम सुरू केला असून या वर्षी 400 ऊसतोड कामगारांच्या मुले व कुटुंबियांना छोटा मदतीचा हात या उद्देशाने फराळाचे वाटप करण्यात आले.