फलटण : खासदारांना प्रतिवर्षी पाच कोटी रुपयांचा निधी मतदार संघातील विकास कामांसाठी उपलब्ध होत असतो. एका लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. परिणामी खासदारांना या सहा विधानसभा मतदार संघात पाच कोटीचा निधी खर्च करता येतो. याउलट एका विधानसभा मतदार संघासाठी आमदारांना चार कोटी रुपये मिळतात. त्यामुळे मतदारसंघाच्या स्थानिक विकास निधीच्या खर्चात खासदारा पेक्षा आमदार अधिक उजवा ठरतो. गेल्या दोन वर्षात खासदार निधीची रक्कम कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाच्या बळकटीकरणासाठी खर्च करण्यात आली होती.
त्यामुळे राज्यात विधानसभेचे 288 आणि विधान परिषदेचे 78 मिळून 366 आमदारांना मतदार संघातील विकास कामासाठी प्रत्येकी चार कोटी रुपये प्रमाणे सुमारे 1464 कोटी रुपये उपलब्ध होतीत. गटारे, पदपथ, शौचालये, रस्ते, व्यायाम शाळा, सामाजिक मंदिरे आदी कामे आमदार विकास निधीतून करता येतात.
कोळकी, मालोजी नगर मधील मुख्य रस्त्याच्या दोन किलोमीटरच्या रस्त्याच्या सुधारणा कामासाठी खा.रंणजितसिंह नाईक निंबाळकर निधीतून 24 लाख रुपये प्रस्तावित करण्यात आलेले आहेत. यापैकी पहिला अर्धा किलोमीटर रस्त्याचे खडीकरण झाले असून डांबरीकरण करण्यात येणार आहे. हा रस्ता तयार करताना पाण्याचा थोडासुद्धा वापर न केल्याने टाकलेली खडी रस्त्यावर कशी चोपून बसणार अशी शंका ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. रोलिंग केल्यामुळे खडी चोपून बसते आणि डांबरीकरण होणार असल्याने पाण्याची गरज नसल्याचे संबंधित सांगत आहेत. सदर रस्त्याचे काम जिल्हा परिषदे मार्फत खासगी ठेकेदारांकडून करण्यात येणार आहे. पाण्याचा वापर न करता सदर पद्धतीने डांबरीकरण केलेला रस्ता फार काळ टिकणार नाही असे , या क्षेत्रातील जाणकार सांगतात.
प्रस्तावित दोन किलोमीटरमध्ये रस्त्याचा काही भाग ग्रामपंचायत निधीतून करण्यात आलेला आहे. तर सुरुवातीचा अर्धा किलोमीटर आणि शेवटचा अर्धा किलोमीटर रस्त्याची खासदार निधीतून सुधारणा करण्यात येणार असल्याचे समजते. तर काही का होईना रस्त्याचे काम सुरू झाल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा विश्वास टाकला आहे. हा रस्ता अतिशय खराब झालेला होता. त्यामुळे ग्रामस्थांचे हाल होत होते परिणामी ग्रामस्थ ओरडून अगतिकपणे सर्व सहन करीत होते.