कराड : महाराष्ट्र राज्य सरकारच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाकडून महाराष्ट्र शासन राजपत्राद्वारे दि कराड अर्बन को- ऑप. बँक लि. कराडला महाराष्ट्र राज्यामध्ये सहकार क्षेत्रातील शिक्षण व प्रशिक्षणासाठी राज्य शिखर संस्था म्हणून अधिसूचित केले आहे. सातारा, सांगली व कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये अशा प्रकारचे नामांकन मिळालेली कराड अर्बन बँक ही एकमेव संस्था असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष डॉ. सुभाष एरम यांनी दिली.
सन 1999 पासून विद्यानगर येथे बँकेचे सेवक प्रशिक्षण व संशोधन केंद्र सुरु आहे. याद्वारे सातारा व सांगली जिल्ह्यातील युवकांना तसेच महाराष्ट्रातील विविध सहकारी वित्तीय संस्थांना व सेवकांना कार्यक्षमता आणि कौशल्य वाढीसाठी प्रशिक्षण व मार्गदर्शन दिले जाते. याचप्रमाणे सहकार खात्याच्या आदेशानुसार सुचविलेल्या विविध विषयांवरती तसेच कायद्यांवरती अनुभवी व तज्ञ प्रशिक्षकांकडून मार्गदर्शन केले जाते. याचा निश्चितच फायदा सातारा, सांगली व पुणे जिल्ह्यातील बहुतांशी सहकारी वित्तीय संस्थांना झाला असून संस्थेस राज्य शिखर दर्जा प्राप्त झाल्यामुळे कराड अर्बन बँकेच्या शतकोत्तर वाटचालीत शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला असल्याचे कुटुंबप्रमुख सुभाषराव जोशी यांनी सांगितले.
दि कराड अर्बन को-ऑप. बँक लि. कराडच्या विद्यानगर येथील स्वमालकीच्या इमारतीमध्ये सुरू असलेल्या सेवक प्रशिक्षण व संशोधन केंद्रामध्ये 50 प्रशिक्षणार्थी बसतील असे वातानुकूलित प्रशस्त असे दोन स्वतंत्र ज्ञानकक्ष आहेत. त्याचप्रमाणे ऑडिओ, व्हिडिओ एलसीडी व ओव्हरहेड (प्रोजेक्टर) याद्वारे प्रशिक्षण देण्यासाठी स्वतंत्र संगणक कक्ष आहे. तसेच 80 प्रशिक्षणार्थीसाठी सर्व सोयींनीयुक्त अशी निवास व्यवस्था व प्रशस्त लायब्ररी असल्याची माहिती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सीए दिलीप गुरव यांनी दिली.
सातारा येथे सुद्धा वातानुकूलित प्रशिक्षण केंद्राची व्यवस्था आहे. दि कराड अर्बन को-ऑप. बँकेमध्ये आय. टी क्षेत्रासंबंधित असलेल्या अद्यावत डाटा सेंटर व ट्रेझरी विभागातील अद्यावत सेवा सुविधांच्या आधारे इतर बँकांना याबाबत प्रशिक्षण व मार्गदर्शन दिले जाते. तसेच बँकांच्या विविध धोरण निर्मितीसाठी सहाय्य केले जात असल्याचे सीए दिलीप गुरव यांनी यावेळी सांगितले. त्याचप्रमाणे आवश्यकता भासल्यास बाहेरील व्यक्तींनासुध्दा मार्गदर्शनासाठी आमंत्रित करण्यात येते असेही गुरव म्हणाले. यावेळी बँकेचे उपाध्यक्ष समीर जोशी, संचालक, बँकेचे वरिष्ठ अधिकारी व सेवक उपस्थित होते.