घरोघरी जाऊन करण्यात येणार सर्वेक्षण
सातारा
राज्य शासनाने १ जुलै पासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लागू केली आहे. या योजनेच्या लाभापासून एकही पात्र लाभार्थी वंचित राहू नये यासाठी जिल्हा प्रशासनाने नियोजन केले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील प्रत्येक घरी जाऊन कुटुंबातील महिलांची माहिती घेतली जाणार असल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.
यावेळी पुढे बोलताना जिल्हाधिकारी डूडी म्हणाले या योजनेच्या सर्वेक्षणासाठी अंगणवाडी सेविका, मदतनीस, ग्रामसेवक, तलाठी हे घरोघरी जाऊन माहिती गोळा करणार आहेत. तसेच पात्र लाभार्थ्यांचे अर्ज जागेवरच नारीशक्ती दूत अॅपच्या माध्यमातून भरण्यात येणार आहे. शासनाने या योजनेच्या अटी शिथिल केल्या आहेत. तसेच लागणारी कागदपत्रे ही कमी केली आहेत. त्यामुळे या योजनेसाठी अर्ज करणे सोपे झाले आहे.
अर्ज भरण्यासाठी लाभार्थी महिलांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी शासकीय कर्मचारी त्यांच्या घरी जाऊन पडताळणी करून जागेवर अर्ज भरण्याची प्रक्रिया करतील. आता डोमिसाईल प्रमाणपत्राचा पर्याय म्हणून १५ वर्ष जुने रेशन कार्ड किंवा मतदान ओळखपत्र ही चालणार आहे. त्यामुळे महिलांनी कागदपत्रे काढण्यासाठी शासकीय कार्यालयात गर्दी करण्याची आवश्यकता भासणार नाही. नवीन निकषांनुसार कार्यवाही करण्यात येईल. जिल्ह्यात किमान पन्नास कुटुंबांमध्ये एक शासकीय कर्मचारी सर्वेक्षणाचे काम करेल. यामुळे जिल्ह्यातील एकही पात्र लाभार्थी या योजने पासून वंचित राहणार नाही.
तरी महिलांनी कोणतीही घाई न करता घरोघरी लाभ देण्याच्या या मोहिमेत सहकार्य करावे असे आवाहन यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले.