वाई : येथील औद्योगिक वसाहतीतील एका खासगी कंपनीत काम करणाऱ्या महिला कामगारांचा मशीनमध्ये अडकल्याने मृत्यू झाला.ही घटना मंगळवारी सकाळी साडे सातच्या सुमारास घडली. छाया संतोष बोधे (वय ३८ ) असे मशीनमध्ये अडकून मृत्यू झालेल्या महिला कामगाराचे नाव आहे.याबाबत माहिती अशी की, छाया बोधे या मागील सहा वर्षांपासून गरवारे टेक्निकल फायबर्स या कंपनीत काम करीत आहेत. मंगळवारी सकाळी त्या कामावर गेल्या. रोप-वेचे काम करण्यासाठी मशीन सुरु करत असताना त्याचा पाय नेटमध्ये अडकल्याने त्यांचे संपूर्ण शरीर वेगाने दोरीसोबत गुंडाळले गेले. यावेळी कामावर असलेल्या अन्य कामगारांनी त्वरित मशीन बंद केले.दरम्यान त्या बेशुद्ध पडल्या होत्या. त्यांना तातडीने वाईतील खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. मात्र त्यापूर्वीच छाया बोधे यांचा मृत्यू झाला. त्यांचे पती संतोष तान्याबा बोधे हे देखील कंपनीत काम करीत आहेत. त्यांना दोन मुली व एक मुलगा आहे. या घटनेची नोंद वाई पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.





























