महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसातारा, दि. ७ एप्रिल : नुकत्याच संपलेल्या सन २०२१-२२ या आर्थिक वर्षामध्ये सातारा उपप्रादेशिक परिवहन (आरटीओ) कार्यालयाने तब्बल १२३.२३ कोटी रुपयांचा विक्रमी महसूल जमा केला असून सदरचा महसूल हा सन २०२०-२१ या आर्थिक वर्षातील ९०.४१ कोटी रुपये वसूल झालेल्या महसूलापेक्षा या वर्षीचा महसूल हा तब्बल 33 कोटी रुपयांपेक्षा ज्यादा झाल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांनी दैनिक महाराष्ट्र न्यूज शी बोलताना दिली. सन २०२१-२२ या आर्थिक वर्षातील सातारा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचा आढावा घेताना चव्हाण म्हणाले, सन २०२१-२२ या आर्थिक वर्षामध्ये तपासणी पथकांच्या कामगिरीचा आलेख मोठ्या प्रमाणावर असल्याचे दिसून येत आहे तपासणी पथकाने देण्यात आलेल्या लक्षांकाच्या तुलनेत प्रत्यक्ष कामगिरीही ११२ टक्के इतकी झाली आहे. तपासणी पथकाकडून मोठ्याप्रमाणात वाहन तपासणी करण्यात आली. यामध्ये ५७६३ वाहनावर कारवाई करून दंड व कर मिळून ५ कोटी ३२ लाख रुपये इतका महसूल गोळा करण्यात आलेला आहे. थकीत मोटार वाहन कर वसुलीसाठी कार्यालयाने सातत्याने प्रयत्न केले आहेत तसेच कार्यकारी अधिकारी निहाय लक्षांक देणे व विशिष्ट विभाग मिळवून देणे अशा प्रकारची कार्यवाही केल्यामुळे लिखित मोटार वाहन कर वसुली १२ कोटी ९२ लाख इतक्या मोठ्या प्रमाणावर झालेली आहे. १२ हजार पेक्षाही जास्त वाहनधारकांना कर मागणी पत्र पाठवून वसुलीचे प्रयत्न केलेले आहेत.
थकित पर्यावरण कर वसुलीसाठी मोठ्या प्रमाणावर मागणी पत्र जारी करण्यात आले. ५० हजार पेक्षा हि जास्त वाहनधारकांना बजावणी करण्यात आली. सन २०२०-२१ या आर्थिक वर्षामध्ये २ कोटी वसुली झाली होती. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होऊन ३ कोटी ४४ लाख इतकी झाली आहे. या पुढील काळात कर मागणी पत्र जारी करूनही त्यांनी कर भरणा केलेला नाही, ही प्रकरणे न्यायालयात दाखल करण्यात येणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. नागरिकांना देण्यात येणाऱ्या आकर्षक क्रमांकमध्ये यावर्षी मोठ्या प्रमाणात महसूल वाढलेला आहे. सन २०२०-२१ या आर्थिक वर्षापेक्षा या वर्षी १ कोटी ५१ लाख रुपयांची वाढ झाल्याचे दिसून येत आहे. नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षामध्ये ३३ हजार १०३ इतक्या नवीन वाहनांची नोंद झालेली आहे. त्या २३ हजार ५४७ दुचाकी वाहने आहेत. दि. ३१ मार्च २०२२ रोजी सातारा कार्यालयाच्या अभिलेखा वरील एकूण संख्या ही ९ लाख १ हजार ३६३ इतके असून त्यापैकी सर्वाधिक ६ लाख ९७ हजार १०७ इतकी दुचाकी वाहनांची संख्या आहे.