मलकापूर नगरपरिषदेच्या उपविधीचा सध्या मलकापूरमध्ये राहणाऱ्या कोणत्याही नागरिकांवर बोजा नाही
महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी : मलकापूर नगरपरिषदेने शहराचे वाढते शहरीकरण व भविष्यातील लोकसंख्या याचा विचार करता, भविष्यामध्ये नागरिकांना मुलभूत सुविधा उपलब्ध करुन देणेसाठी व कार्यरत असणाऱ्या योजनांचे बळकटीकरण व क्षमता वाढविणे भरावी लागणारी 10% रक्कम याचा विचार करुन दि.03/02/2022 रोजीचे विशेष सभेमध्ये मा.जिल्हाधिकारी, सातारा यांचे जा.क्र.साशा/नपा/कार्या-8/1069/2021, दि.31/12/2021 अन्वये नगरपरिषद अधिनियम 1965 चे कलम 322 मधील तरतुदीनुसार शुल्क/ फी/ दगणी/ लोकवर्गणी बाबत उपविधीबाबत सुचित केलेप्रमाणे सांडपाणी प्रक्रिया, घनकचरा व्यवस्थापन व 24×7 पाणीपुरवठा योजना या योजनांसाठी उपविधींना मान्यता देऊन ते नागरिकांच्या हरकती व सुचनांसाठी प्रसिध्द करणेत आले होते. सदरचे उपविधी हे मलकापूर शहरामध्ये केवळ नव्याने तयार होणारी अपार्टमेंट व गृहसंकुले यासाठीच लागु राहणार असून, सध्या राहत असणाऱ्या कोणत्याही मिळकत धारक/ नागरिकांवर याचा कोणताही बोजा पडणार नाही. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. केवळ नागरिकांच्या मनामध्ये नगरपरिषदेच्या कामकाजाबाबत गैरसमज व दिशाभूल करणेचा प्रयत्न केला जात आहे. याची नागरिकांनी नोंद घ्यावी. मलकापूर नगरपरिषदेने शहरातील नागरिकांच्या मुलभूत नागरी सुविधा उपलब्ध करुन देणेसाठी सन 2009 पासून 24×7 नळ पाणीपुरवठा योजना कार्यान्वीत ठेवली असून, सदरची योजना 2020 सालची लोकसंख्या गृहीत धरुन करण्यात आली होती. परंतु नगरपरिषदेने शहरामध्ये नागरिकांसाठी उपलब्ध करुन दिलेल्या मुलभूत नागरी सुविधा पाहता इतर शहरांपेक्षा मलकापूर शहरामध्ये राहणेसाठी नागरिकांची असणारी प्रथम पसंती असलेने शहरामध्ये रहिवाशी विभाग वाढत असल्याने सध्या असणारी 24×7 नळ पाणीपुरवठा योजना बळकटीकरण करणे, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प विस्तारीकरण करणे या प्रकल्पांच्या अंदाजपत्रकीय रकमेचे 10% रक्कम भरणे आवश्यक आहे. तसेच शहरातील सांडपाणी प्रक्रिया योजना, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प व 24X7 नळ पाणीपुरवठा योजना दैनंदिन देखभाल दुरुस्ती करणे इत्यादी कामांसाठी करावा लागणारा खर्च नगरपरिषद स्व: फंडातून खर्च करावी लागणार आहे. तथापि, नगरपरिषदेस संकलित कर व पाणी पट्टी व्यतिरिक्त अन्य उत्पन्नाचे इतर अन्य साधन नसलेने जे नागरिक मलकापूर शहरामध्ये नव्याने अपार्टमेंट व गृह संकुले बांधणार आहेत केवळ त्याच नागरिकांकडून उपविधीमध्ये नमुद केलेली रक्कम लोकवर्गणीच्या स्वरुपात त्याच कामासाठी घ्यावी लागणार आहे. मलकापूर शहरात होणारी मोठ-मोठी रहिवाशी संकुले उभी राहत असलेने त्यांना मुलभूत सुविधा देणेचा बोजा नगरपरिषदेवर पडत आहे. सध्या मलकापूर नगरपरिषद सर्व सोई-सुविधा उपलब्ध करुन देत असून, सध्या राहत असणाऱ्या नागरिकांसाठी पुरविणेत येणाऱ्या मुलभूत नागरी सुविधा पुरेशा आहेत. तथापि, भविष्याचा विचार करुन नगरपरिषदेने योजनांची क्षमता वाढविणेचे काम करावे लागणार आहे. मलकापूर नगरपरिषदेने दि.15/02/2022 रोजी सन 2022-23 या सालचे अंदाजपत्रक मंजुर केले असून, या अंदाजपत्रकामध्ये कोणत्याही प्रकारची कर वाढ केलेली नाही. त्यामुळे वर्तमान पत्रामधून प्रसिध्द केलेल्या कर वाढीच्या बोजाबाबत केलेली विधाने पुर्णपणे चुकीची असून, नगरपरिषदेचे विशेष सभेमध्ये उपस्थिती असणाऱ्या सर्व नगरसेवक/ नगरसेविकांनी उपविधींना लोकांच्या हितासाठी मान्यता देणेत आलेली आहे. विशेष सभेमध्ये याबाबत सखोल चर्चा करुन सर्व सदस्यांनी आपले योगदान दिले आहे. सध्या असणारे नगरपरिषदेचे सर्व नागरी सुविधा प्रकल्प कार्यान्वीत राहणे व भविष्यामध्ये या प्रकल्पांचे विस्तारीकरण करणे याचा विचार करुन व भविष्यामधील दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून हे उपविधी करणेत आलेले आहेत. तथापि, काही मंडळींकडून गैरसमज पसरविणेचा प्रयत्न केला जात असलेने नागरिकांनी या बाबत सतर्क रहावे. नागरिकांच्यामध्ये गैरसमज निर्माण होऊ नये याकरिता खुलासा दिला असून, मलकापूर शहरातील नागरिकांनी नगरपरिषदेच्या सर्व नाविण्यपुर्ण उपक्रमांना नेहमीच सकारात्मक दृष्टीकोन ठेवून विश्वास ठेवलेला आहे. तोच विश्वास कायम रहावा असे आवाहन उपनगराध्यक्ष श्री.मनोहर भास्करराव शिंदे यांनी केले आहे.