ग्रामपंचायत व पोलीस प्रशासनाच्या कामावर भाविकांची नाराजी
बिदाल प्रतिनिधी (आकाश दडस )
माण तालुक्यातील शिखर शिंगणापूर येथे सोमवारी भाविक भक्त महादेवाच्या दर्शनासाठी आले होते. मात्र या ठिकाणी ग्रामपंचायत व मंदिर समिती व पोलीस स्टेशन यांनी लक्ष न दिल्यामुळे वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. यावेळी भाविकांनी प्रशासनाच्या कारभाराच्या विषयी नाराजी व्यक्त केली आहे.
मागील महिन्यात शिखर शिंगणापूर येथील महादेवाची यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या यात्रेनंतर राज्यातील भाविक भक्त प्रत्येक सोमवारी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात येत असतात.मात्र येथील ग्रामपंचायत मंदिर समिती व पोलीस स्टेशन यांचे नियोजन नसल्यामुळे भाविकांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. या परिसरामध्ये प्रत्येक वाहनाच्या मालकाकडून पार्किंगच्या नावाखाली दहा रुपये घेतले जातात. मात्र पार्किंगची सुविधा अजिबात व्यवस्थितपणे दिली जात नाही.
या परिसरात महिलांसाठी व पुरुषांसाठी शौचालय व मुतारी अजिबात चांगल्या प्रकारे स्वच्छ नसल्यामुळे उघड्यावर जावे लागत आहे . मंदिर समितीकडून या परिसरात पिण्याच्या पाण्याची सुविधा अजिबात दिले जात नाही. त्यामुळे भाविकांना बिसलरी व पाणी विकत घ्यावे लागत आहे.तरी संबंधित प्रशासनाने व ग्रामपंचायतीने लक्ष देणे गरजेचे आहे.
लोकप्रतिनिधींकडून देवालासुद्धा आश्वासने ?
शिखर शिंगणापूरच्या महादेवाला लाखो भाविक येत असतात. आपली इच्छा पूर्ण व्हावी म्हणून देवाकडे मागणी करत असतात. मात्र माण तालुक्यातील सरपंच,राजकीय नेते, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, आमदार-खासदार हे देवालासुद्धा आश्वासन देण्यात खूप हुशार आहेत. त्यामुळे शिंगणापूर येथे पार्किंगची व्यवस्था व पिण्याचे पाणी या सुद्धा मूलभूत सुविधा पुरवण्यात अपयशी ठरले आहेत.
फोटो ओळी
शिखर शिंगणापूर (ता माण )येथे उन्हात वाहनांची गर्दी (छायाचित्र आकाश दडस )