फलटण तालुक्यातील तरडगाव जवळ असलेल्या ऐतिहासिक चांदोबाचा लिंब येथे ऊत्साहात पार पडले. टाळ मृदुंगाच्या साथीने लाखो वारकऱ्यांच्या आणि हजारो भाविकांच्या उपस्थितीत डोळ्यांचे पारणे फेडणारा अश्व दौडीचा हा नयनरम्य सोहळा माऊली…माउलींच्या जयघोषात पहील्या उभ्या रिंगणाचा सोहळा तरडगाव जवळील चांदोबाचा लिंब याठिकाणी उत्साहात संपन्न झाला.
माउलींचा पालखी सोहळा रविवार सायंकाळपासून लोणंद येथे अडीच दिवसांसाठी विसावला होता. मंगळवारी सकाळी लोणंद येथे पालखीतळावर राजकीय सामाजिक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी माऊलींचे दर्शन घेतले. मंगळवारी दुपारी महाआरती व नैवेद्य झाल्यावर माउलींचा पालखी सोहळा तरडगावकडे निघाला. खंडाळा तालुक्यातून फलटण तालुक्यात प्रवेश करताना सरदेचा ओढा येथे मान्यवरांच्या उपस्थित फलटण तालुक्याच्या वतीने सोहळ्याचे स्वागत करण्यात आले.
पालखी मार्गावरील ऐतिहासिक चांदोबाचा लिंब याठिकाणी प्रथम पालखीचा मानाचा नगारखाना, माउलींचा चांदीचा रथ पोहचल्यावर सर्व दिंड्या आहे त्या जागीच थांबविण्यात आल्या. सर्व दिंड्यातील वारकऱ्यांनी दोन्ही बाजूने उभे रहात रिंगणासाठी माउलींचा जयघोष सुरू केला. यावेळी चोहोबाजूंनी ‘याची देही ,याची डोळा’ रिंगण सोहळा पाहण्यासाठी आलेल्या भाविकांचा उत्साह ओसंडून वाहत होता
चोपदारांनी उभे रिंगण करण्यासाठी जागा पाहणी केल्यावर पालखी सोहळ्यापुढे असणारे दोन अश्व ज्यात एकावर स्वत: माउली स्वार असतात. तर दुसरा शितोळे सरकारांचा आळंदी संस्थानचा घोडा ज्यावर चोपदार हातात झेंडा घेऊन बसलेला असतो. चोपदारांनी दंड उंचावून इशारा दिल्यावर या दोन्ही अश्वांनी वेगाने दौड घेत रथापुढील २७ व रथामागील २० दिंड्यां पर्यंत जावून पुन्हा ते माउलींच्या रथापर्यंत आले. यावेळी त्यांना नैवैद्य भरविण्यात आला . त्यानंतर पुन्हा अश्वांनी एकमेकांशी स्पर्धा करीत वारीतील पहिले उभे रिगणं पूर्ण केले. यानंतर अश्वांच्या टापाखालील माती कपाळी लावण्यासाठी वारकरी आणि भाविकांचक एकच गर्दी उसळली.
या वेळी परिसरात सुरू असलेला नामघोष आणि महिला- पुरुषांनीही बेभान होऊन घातलेल्या फुगड्या अणि फेर धरून येथे स्वर्ग सुखाचा सोहळाच सुरू केला होता. रिंगणाच्या जागेत सुंदर रांगोळ्या काढलेल्या होत्या. रिंगण सोहळा आटपून विविध खेळ खेळून पुन्हा अलोट उत्साहाने न्हालेले वारकरी पुढील मुक्कामासाठी तरडगावच्या दिशेने मार्गस्थ झाले.






















