पाटण शहरातील अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणे काढावीत मनसे शहराध्यक्ष चंद्रकांत बामणे यांची मागणी नगरपंचायतीचे दुर्लक्ष
पाटण: पाटण नगरपंचायतीच्या हद्दीत शहरातील अनेक ठिकाणी शासकीय नियमांना तिलांजली देत शेकडो इमारती उभ्या राहिल्या आहेत. त्याचबरोबर नगरपंचायत प्रशासनाला अंधारात ठेवून अनेक विनापरवाना अनधिकृत बांधकामेही करण्यात आली आहेत. नगरपंचायत प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होणे ही दुदैवी बाब म्हणावी लागेल. या अनधिकृत बांधकामामुळे नगरपंचायतीचा महसूल तर बुडतोच शिवाय सर्वसामान्य नागरिकांना देखील त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे पाटण नगरपंचायतीने याची गांभिर्याने दखल घेवून अनधिकृत बांधकामे तातडीने काढावीत, अशी मागणी पाटण शहरातील नागरिकांच्यावतीने मनसेचे शहराध्यक्ष चंद्रकांत बामणे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.दरम्यान या निवेदनाची प्रत विभागीय आयुक्त पुणे व मुख्याधिकारी अभिषेक परदेशी यांनाही देण्यात आली आहे.निवेदनात म्हटले आहे, पाटण शहरात दिवसेंदिवस अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणे वाढत असून नगरपंचायतीचे याकडे सर्रासपणे दुर्लक्ष होत आहे. याकडे पाहण्यास नगरपंचायत प्रशासनाला वेळ नसल्याने भूखंडाचे श्रीखंड खाणाऱ्या माफियांचे चांगलेच फावले आहे. राज्य शासनाच्या विकास नियंत्रण नियमावलीचे राजरोसपणे उल्लंघन केले जात असून याकडे नगरपंचायतीचे दुर्लक्ष होत असल्याने ही चितांजनक बाब आहे. शहरातील प्रभाग क्र. 13 मध्येही अवैध बांधकामे केली आहेत. अनेकांनी तर नगरपंचायतीचे बांधकामे परवानेही घेतलेले नाहीत. प्रशासनाच्या नियमावलीनुसार इमारतीच्या आजूबाजूला जागा सोडणे बंधनकारक असतानाही फुटभर देखील जागा सोडली नाही. याउलट इमारत बांधकामाच्यावरील गॅलरी सर्रासपणे रस्तावर आल्या आहेत. त्यामुळे याठिकाणाहून कोणतेही चारचाकी वाहन जावू शकत नाही.नगरपंचायतीच्या नियमानुसार जेथे घर तेथे रस्ता अशी शासनाची भूमिका असतानाही अत्यावश्यक सुविधा देणारे वाहन, कचरा गाडी त्याठिकाणी जावू शकत नाही.

अतिक्रमनामुळे भविष्यात येथे एखादी आग, अपघात अशी दुर्घटना घडल्यास ऍम्ब्युलन्स अथवा अग्निशमन दलाची गाडी देखील तेथे पोहोचू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे. अशावेळी आर्थिक हानीबरोबरच जिवीतहानीही नाकारता येत नाही. यापुढे जर अशी घटना घडल्यास त्यास सर्वस्वी पाटण नगरपंचायत जबाबदार असेल. त्यामुळे नगरपंचायत प्रशासनाने तातडीने अतिक्रमणे काढावीत. त्याचबरोबर अनधिकृत बांधकामांवर कारवाई करावी, अशी मागणीही मनसेचे शहराध्यक्ष चंद्रकांत बामणे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.






















