उंब्रज-प्रतिनिधी :
( कळंत्रेवाडी येथील प्रकार; पशुपालक शेतकऱ्यांमधून संतापाची लाट)
कळंत्रेवाडी,ता. कराड येथे जानेवारी महिन्यात पशुसंवर्धन विभाग व ग्रामपंचायत प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने लाळ लसीकरण शुभारंभ मोठ्या दिमाखात संपन्न झाला होता. परंतु,गावातील जुन्या दत्त मंदिर परिसरातील बहुतांश पशुपालक शेतकरी लसीकरणापासून वंचितच असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे लाळ लसीकरण मोहिमेचा फज्जा उडाला असून पशुसंवर्धन विभाग व स्थानिक प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे पशुपालक शेतकऱ्यांमधून संतापाची लाट उसळली आहे.दरम्यान, यामध्ये विद्यमान महिला ग्रामपंचायत सदस्या असलेल्या सौ सविता थोरात यांचेच पशुधन लसीकरणापासून वंचित असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात असून सत्तेमध्ये असणाऱ्या दस्तुरखुद्द ग्रामपंचायत सदस्याचेच पशुधन लसीकरणापासून वंचित असेल तर सर्वसामान्यांचे काय ? हा प्रश्न उपस्थित झाल्यास आश्चर्य वाटायला नको. दरम्यान, लसीकरणाचा शुभारंभ ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारात देशी गायीचे पूजन करून ग्रामपंचायतचे पदाधिकारी, गावातील प्रतिष्ठित तसेच ज्येष्ठ नागरिक यांच्या उपस्थितीत मोठ्या दिमाखात करण्यात आला. शुभारंभ झाल्यानंतर दत्त मंदिर परिसरातील उपस्थित सर्व पशुपालक शेतकरी आपापल्या घरी दिवसभर लसीकरण पथकाची वाट पाहत थांबले होते.परंतु, दिवसभरात लसीकरण पथकाचा कोणीही कर्मचारी लसीकरणासाठी फिरकला नसल्याचे वंचित पशुपालक शेतकऱ्यांनी सांगितले. पशुसंवर्धन विभाग व ग्रामपंचायत प्रशासनाने लसीकरणाचा शुभारंभ मोठ्या दिमाखात करत फक्त आरंभशूरपणाचे दर्शन घडवले आहे. वास्तविक पाहता लसीकरणादरम्यान गावातील किती पशुंना लसीकरण झाले?अजून किती पशु लसीकरणापासून वंचित आहेत? वंचित असतील तर मग पशुसंवर्धन विभागाला कळवून लसीकरण करणे. पर्यायाने आपल्या गावातील सर्व पशुधन लाळ रोगापासून सुरक्षित ठेवणे. ही ग्रामपंचायतीचा कारभार हाकणाऱ्या सत्ताधाऱ्यांची जबाबदारी नाही का? याचे आत्मचिंतन ग्रामपंचायतीच्या सत्तेत समाविष्ट झालेल्या सत्ताधारी पदाधिकाऱ्यांना करावे लागणार आहे. तरच येत्या काळात विकासाच्या प्रगतीपथावर गावाची वाटचाल सुखकर होईल अशी भावना नागरिक व्यक्त करीत आहेत. त्यामुळे उंब्रज येथील पशुवैद्यकीय दवाखान्यातील पशुधन विकास अधिकारी व ग्रामपंचायत प्रशासनातील पदाधिकाऱ्यांनी आता तरी हा विषय गांभीर्याने घेऊन लाळ लसीकरणापासून वंचित असलेल्या पशुपालक शेतकऱ्यांच्या पशुधनाला लसीकरण करून दिलासा द्यावा अशी मागणी वंचित पशुपालक शेतकऱ्यांमधून होत आहे. दरम्यान,लाळ लसीकरणापासून वंचित असलेल्या जनावरांना लाळ रोगाची बाधा होऊन पशुपालक शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान झाल्यास पशुसंवर्धन विभाग व ग्रामपंचायत प्रशासन त्यास जबाबदार राहणार का? याचेही उत्तर शासनाचा घटक असलेल्या या दोन्ही विभागांना द्यावेच लागेल हे मात्र नक्की. .!