उंब्रज-प्रतिनिधी :
कोर्टीसह चरेगावच्या दोघा जणांवर खाजगी सावकारी प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून पोलिसांच्या या कारवाईने खाजगी सावकारांचे धाबे दणाणले आहेत. याप्रकरणी उंब्रजच्या महिलेने उंब्रज पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याप्रकरणी रविंद्र एकनाथ थोरात रा. कोर्टी हल्ली रा. उंब्रज ता. कराड व बाळकृष्ण सुरेश जाधव रा. चरेगांव ता. कराड अशी खाजगी सावकारी प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.तुमचे काही खरे नाही, असे म्हणून दमदाटी करत संशयितांनी सावकारी दराच्या व्याजाने दिलेल्या रकमेची परतफेड करण्यासाठी उंब्रज ता. कराड येथील एका कुटुंबाला दमदाटी करून परस्पर मालट्रक नेल्याचे फिर्यादिने म्हटले आहे.
याबाबत आक्कुबाई मोहन चव्हाण (वय४०) रा. माणिक चौक उंब्रज ता. कराड, मुळगांव होडती ता. इंडी जि. विजापुर (कर्नाटक) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ट्रकच्या कामासाठी कोर्टी येथील रविद्र थोरात याच्याकडुन दि. १९ सप्टेंबर २०२२ रोजी दरमहा १५ टक्के सावकारी व्याजाने २ लाख रुपये घेतले होते. रकमेची परतफेड करण्यासाठी रविंद्रने ट्रकची नोटरी करून खुश खरेदी करून घेतली होती. या दरम्यान फिर्यादीच्या पतीने व्याजाने घेतलेले २ लाखांची व्याजासह परतफेड केली. यानंतर पुन्हा एकदा ट्रकच्या टायरसाठी ५० हजार रुपये १५ टक्के व्याजदराने घेतले होते. दरम्यानच्या काळात फिर्यादी चव्हाण यांनी बाकीची देणी देण्यासाठी चरेगावच्या बाळकृष्ण जाधव याच्याकडून १ लाख रुपये १५ टक्के व्याजदराने घेतले. यावेळी खोटे स्टॅम्प केले असल्याचे फिर्यादीने म्हटले आहे. तसेच दोन महिने पैशाचे व्याज फिर्यादी चव्हाण देऊ शकल्या नाहीत यावरून संशयितांनी वारंवार घरी येऊन तुमचे काही खरे नाही,अशी दमदाटी केली.तसेच संशयित बाळकृष्ण जाधव याने फिर्यादी चव्हाण यांचा ट्रक पाटण रोडच्या एका पेट्रोल पंपावरून न विचारता परस्पर घेऊन गेला. तर संपूर्ण व्याजासह रक्कम परत दिल्याशिवाय ट्रक तुम्हाला परत देणार नसलेचे फिर्यादीत म्हटले आहे. दि. ८ रोजी उंब्रज पोलीस ठाण्यात सदरची फिर्याद दाखल झाली असून दोघा जणांवर खाजगी सावकारी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याचे स.पो.नि अजय गोरड यांनी सांगितले. अधिक
तपास पोलीस उपनिरीक्षक आबा जगदाळे करत आहेत.