२४ हजार दोनशे रुपयांचा दंड वसूल
दहिवडी : ता.१७
दहिवडी पोलिसांनी गुरुवारी अचानक रोडरोमिओंच्या विरोधात मोठी मोहीम उघडत २४ हजार दोनशे रुपयांचा दंड वसूल केला.
बेशिस्त वाहन चालक, अल्पवयीन मुले, विनापरवाना वाहकांवर दहिवडी पोलिसांनी जोरदार कारवाई केली. दहिवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शाळा आणि कॉलेज परिसरात मुलींना रोड रोमिओंमुळे नाहक त्रास सहन करावा लागत होता,त्या अनुषंगाने त्यांच्यावर धाक बसवणे, त्याचबरोबर विनापरवाना वाहन चालकांना परवान्याबाबत अवगत करणे, अल्पवयीन मुलांच्या वाहन चालवण्याने अनेक घडत असलेले अपघात कमी व्हावे म्हणून एम.व्ही.ऍक्टनुसार त्यांच्यावर कारवाई करणे व पालकांना सूचित करणे हा हेतू समोर ठेवून दहिवडी पोलिसांनी कारवाई केली.
या कारवाईत मोटार वाहन अधिनियमाप्रमाणे एकूण चोवीस केसेस करून २२हजार ४०० रुपयांचा दंड वसूल केला. त्याचबरोबर महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ११०/११७ प्रमाणे ५३ केसेस दाखल करून त्यांच्यावर कारवाई केली. त्याचबरोबर भारतीय दंड विधान सहिता कलम २८३ प्रमाणे तीन केसेस दाखल करण्यात आल्या.
बस स्थानक परिसर, दहिवडी कॉलेज परिसर,फलटण चौक, बिदाल चौक या ठिकाणी पोलिसांनी स्पेशल ड्राईव्ह घेऊन बेशिस्त वाहन चालक,अल्पवयीन वाहन चालक आणि रोड रोमिओ यांच्यावर कारवाई केली.
या कारवाईमध्ये दहिवडी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी, पोलीस अंमलदार यांच्यासह वाहतूक पोलीस अंमलदार आदींनी सहभाग घेतला. वाहतुकीची शिस्त सर्वाना लागावी म्हणून दहिवडी पोलिसांनी उघडलेल्या या मोहिमेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
नागरिकांनी अल्पवयीन मुलांना वाहन चालवण्यास देऊ नये. मोटार वाहन अधिनियमाण प्रमाणे अल्पवयीन मुलांना वाहन चालवण्यास दिल्यास पालकांवर दंडात्मक स्वरूपाची कारवाई करण्यात येणार आहे.
—— अक्षय सोनवणे
सहाय्यक पोलीस निरीक्षक ,दहिवडी पोलीस ठाणे