सातारा : सातारा जिल्ह्याचा भूमिपुत्र एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर जिल्हावसियानी फटाके वाजवून अन् पेढे वाटून आनंद केला. मात्र, आता त्याच शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार मुख्यमंत्र्यांकडून होत आहे. कर्जमाफी पासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन निधी देण्याचे जाहीर करण्यात आले मात्र अद्याप सातारा जिल्ह्यातील २० हजार शेतकऱ्यांना निधी मिळाला नसून तो तात्काळ खात्यात जमा करावा, अशी मागणी रयत क्रांती संघटनेचे युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रकाश उर्फ सोनू साबळे यांनी केली आहे.
देशातील सर्वात मोठी कर्जमाफी काँग्रेस सरकारने केली मात्र त्या सरकारने कोठे गाजावाजा केला नाही. मात्र, विद्यमान सरकारने जाणीवपूर्वक शेतकऱ्यांना अप्रत्यक्ष अपमानित करण्यासाठी जाहीर कार्यक्रमाचे आयोजन करून प्रमाणपत्राचे वाटप केले. मुळात शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. सर्वात मोठा करदाता देखील आहे . तो अडचणीत आल्यानंतर त्याला हात देणे सरकार म्हणून कर्तव्यच आहे. मात्र त्याला हात देत असताना सन्मानपूर्वक देणे आवश्यक आहे. मात्र, नेमका उलटा प्रकार शिंदे सरकारकडून सुरू आहे.
कृषी सेवा केंद्राच्या बाहेर देखील प्रधानमंत्री यांचे फलक लावण्याची सक्ती करण्यात आलीय. वास्तविक काम कमी आणि प्रसिद्धी जास्त असे प्रकार सुरू आहेत. सरकारने खुशाल प्रसिध्दी करावी पण शेतकऱ्याला त्याच्या घामाचा मोबदला देण्यासाठी देखील प्रयत्न करावा. कर्जमाफीतून नियमित कर्ज भरणारे वगळले होते मात्र त्यानंतर प्रोत्साहन निधी प्रत्येकी ५० हजार रुपये देण्याचे जाहीर केले. ह्या घोषणेला आता एक वर्षापेक्षा अधिकचा कालावधी उलटून गेला तरी सातारा जिल्ह्यात अद्याप २० हजारांपेक्षा शेतकरी निधी जमा होण्याची प्रतीक्षा करत आहेत. त्या शेतकऱ्यांनी नियमित कर्ज फेड केली, ही चूक केली का ? तसेच आमदार, खासदारांचे पगार ज्या नियमित वेळेत केले जातात तर शेतकऱ्याचीच प्रत्येक वेळी अडवणूक करून सरकारला नेमके काय साध्य करायचे आहे ? हा प्रश्न आहे.
त्यामुळे शेतकऱ्याला जास्त न नडवता तात्काळ प्रोत्साहन निधी सातारा जिल्ह्याचे सुपुत्र एकनाथ शिंदे यांनी लक्ष घालावे व आपल्या सुपर फास्ट व्यक्तिमत्वाची झलक दाखवावी. अन्यथा शिंदे यांची देखील बोलाची कढी अन बोलाचा भात अशीच वृत्ती असल्याचे समोर येवू नये अन् तसे झाल्यास क्रांतिकारकांच्या जिल्ह्यातील शेतकरी स्वस्थ बसणार नाही आणि पुढे जिल्ह्याचा सुपुत्र असले तरी त्यांच्या विरोधात तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडायला मागे पुढे पाहणार नाही, असा इशारा प्रकाश उर्फ सोनू साबळे यांनी दिला आहे.






















