दहिवडी : ता.२३
दहिवडीचे विद्यमान नगराध्यक्ष सागर पोळ यांना भाजपने सोबत घेत राष्ट्रवादीवर मोठी खेळी केल्याची चर्चा संपूर्ण दहिवडी भर रंगली आहे. दहिवडी नगरपंचायतीस केंद्रशासन पुरस्कृत अमृत २.० योजनेअंतर्गत ४९ कोटी ६३ लाखाचा निधी मंजूर झाला आहे. त्या माध्यमातून दहिवडी नगरपंचायतीस होणाऱ्या पाणीपुरवठा या योजनेचा भूमिपूजन समारंभ माण-खटावचे विद्यमान आमदार जयकुमार गोरे यांच्या शुभहस्ते संपन्न होत आहे. उद्या , रविवारी २४ डिसेंबर रोजी सकाळी १० वा. दहिवडी नगरपंचायतीच्या नूतन इमारतीत होत असलेल्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनेलचे विद्यमान नगराध्यक्ष सागर पोळ हे आहेत.
या भूमिपूजन कार्यक्रमाच्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टीच्या वतीने सोशल मीडियावर एक बॅनर तयार करण्यात आला असून आमदार जयकुमार गोरे, ऍड. भास्करराव गुंडगे, युवा नेते सिद्धार्थ गुंडगे,माजी नगराध्यक्षा साधना गुंडगे, यांच्यासह दहिवडी नगरीतील भारतीय जनता पार्टीचे कट्टर कार्यकर्ते आणि भाजप पुरस्कृत पॅनेलच्या निवडून आलेल्या नगरसेवकांचे फोटो आहेत. उद्याच्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या वतीने व्हायरल करण्यात आलेल्या या सोशल मीडियाच्या बॅनरवर नगराध्यक्ष सागर पोळ यांचाही फोटो झळकल्याने दहिवडीकरांच्या भुवया उंचावल्या आहेत. भाजपने बॅनरच्या माध्यमातून राष्ट्रवादीचे निष्ठावान कार्यकर्ते आणि विद्यमान नगराध्यक्ष सागर पोळ हे आपल्या पक्षात आल्याचे संकेत तर दिले नाहीत ना? सागर पोळ खरचं राष्ट्रवादीला रामराम करणार का? अशा चर्चा आता रंगू लागल्या आहेत.
या एकंदरीत प्रकारावरून केंद्र शासनाच्यावतीने दहिवडी नगरपंचायतीस मिळालेल्या पाणी योजनेचे भूमिपूजन करण्याच्या निमित्ताने नगराध्यक्ष सागर पोळ यांना हाताशी धरत भाजपने राष्ट्रवादीवर मोठी खेळी केल्याची चर्चा संपूर्ण दहिवडीभर रंगली आहे.
चौकट :
राष्ट्रवादीचे नगरसेवक पाणी योजनेच्या भूमिपूजन कार्यक्रमाला उपस्थित राहणार का?
दहिवडी नगरपंचायतीमध्ये सध्या राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनेलची सत्ता आहे. केंद्र शासनाच्या वतीने दहिवडी नगरपंचायतीसाठी देण्यात आलेल्या आणि भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्या शुभहस्ते संपन्न होत असलेल्या ‘अमृत २.०’ या पाणीपुरवठा योजनेच्या भूमिपूजन कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे नगरसेवक उपस्थित राहणार का? हे पाहणे दहिवडीकरांसाठी औत्सुक्याचे ठरणार आहे.






















