दहिवडी : ता.२४
भाजपने नगराध्यक्ष सागर पोळ यांना सोबत घेत राष्ट्रवादीवर केलेली कुरघोडी ही राष्ट्रवादीने भाजपवरच उलटवल्याची चर्चा दहिवडीत रंगली आहे.
रविवारी २४ डिसेंबर रोजी भाजपतर्फे नगरपंचायतीच्या इमारतीत केंद्र शासन पुरस्कृत ‘अमृत २.०’ या योजनेचा आमदार जयकुमार गोरे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. भाजपने राष्ट्रवादीच्या नगराध्यक्षांना सोबत घेत राष्ट्रवादीवर मोठा डाव खेळला होता. मात्र राष्ट्रवादीनेही प्रतिडाव टाकत रविवारीच पाणी योजनेचा शुभारंभ केला. केंद्र शासन पुरस्कृत ४९कोटी ६३लाख रुपयांची नगरपंचायतीसाठी मंजूर झालेल्या योजनेच्या मंजुरीचे प्रभाकर देशमुख यांना श्रेय दिले. याबाबत अधिक माहिती देताना माजी नगरसेवक अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि तत्कालीन जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याकडे प्रभाकर देशमुख यांच्या माध्यमातून झालेल्या पाठपुराव्यामुळे दहिवडीच्या ग्रामस्थांसाठी पाणी योजना मंजूर झाली. आंधळी धरणातून सुमारे ५० कोटी रुपयांच्या मंजूर झालेल्या योजनेमुळे दहिवडीकरांना मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध होणार असल्याचेही अजित पवार म्हणाले.
यावेळी दहिवडी नगरपंचायतीमधील नगराध्यक्ष सागर पोळ वगळता राष्ट्रवादी पुरस्कृत नगरसेवक, राष्ट्रवादी समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या एकंदरीत राजकीय जिरवाजीरवीत वरचढ कोण ठरणार? त्यामुळे नगरपंचायतीसाठी मंजूर झालेली पाणी योजना नेमकी कुणाची? यावरून भाजप – राष्ट्रवादीमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.






























