दहिवडी : ता.२२
संपूर्ण महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेतृत्व करणाऱ्या मनोज जरांगे यांनी आंतरवाली सराटीत पुन्हा उपोषण सुरू करत सगे सोयऱ्यांच्या समावेशासाठी सरकारला धारेवर धरले आहे. त्याच पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी २४ फेब्रुवारीपासून सरकारकडे केलेल्या मागण्या मान्य होईपर्यंत रास्ता रोको करण्याचे आवाहन सकल मराठा समाजाला केले आहे. त्या पार्श्वभूमीवर माण तालुक्यातील मराठा समाजातील समन्वयकांमध्ये निर्माण झालेल्या अंतर्गत कलहामुळे त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
दोन दिवसांपूर्वी शिंदे सरकारने ५०टक्केच्या वरील असलेले(ओबीसी सोडून) १०टक्के आरक्षण मराठा समाजाला देऊ केले.त्या अनुषंगाने सरकारी पक्षाच्या समर्थनार्थ असलेल्या मराठा बांधवांनी एकमेकांना पेढे वाटत भरवत सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले. तर सरकारचा हा निर्णय मान्य नाही म्हणत मराठा समाजातील जरांगे पाटलांच्या समर्थकांनी सरकारच्या निर्णयाच समर्थन करणाऱ्याला मराठा समजल जाणार नाही, अशा प्रकारच्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केल्या. त्याच पार्श्वभूमीवर मराठा समाजाची दिशा नेमकी कोणती असणार? मनोज जरांगे पाटलांच्या आवाहनाला मराठा समाज किती प्रतिसाद देणार? त्याचबरोबर माणमधील मराठा समाजातील बांधवांमध्ये निर्माण होत असलेली दरी वाढत जाणार का? जरांगे पाटलांकडून आलेल्या सूचनांबाबत माणमधील मराठा समाजाकडून नेमकी कशी भूमिका घेतली जाणार? याबाबत लोकांमध्ये तर्क वितर्काना उधाण आले आहे.
या एकंदरीत विषयासंदर्भात मराठा समाजाची दिशा उद्या ठरवली जाईल. मराठा समाजाच्या उद्या होणाऱ्या बैठकीत सर्वानुमते निर्णय घेऊन पुढे काय करायचे याचा विचार केला जाईल.
——- बालाजी जगदाळे. मराठा क्रांती मोर्चा समन्वयक, माण.
आम्ही जरांगे पाटलांसोबतच आहोत. आम्ही आम्हाला होईल त्याप्रमाणे जरांगे पाटील यांच्या सूचनेप्रमाणे आम्ही रास्ता रोको करणार आहे.
—–सागर कट्टे, मराठा क्रांती मोर्चा समन्वयक, माण.
आम्ही मनोज जरांगे पाटील सांगतील तशाप्रकारे वागू. त्यांचा जो आदेश येईल तो आम्ही पाळू आणि रस्ता रोको करू.
—– राजू मुळीक, मराठा क्रांती मोर्चा समन्वयक, माण.






















