युतीपुढील अडचणी वाढण्याची मोठी शक्यता , माण खटावमधून निंबाळकरांचे लीड गोरेचं रोखणार?
दहिवडी : ता.१६
माढा लोकसभा मतदार संघाच्या युती विरुद्ध आघाडी अशा असणाऱ्या लढाईत आता माण-खटावमधील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख शेखर गोरे यांनी उडी घेतली आहे.
काही दिवसांपूर्वी गोरे यांनी प्रसिद्धी माध्यमांद्वारे तालुक्यातील राष्ट्रवादीने आपल्यासोबत कायम गद्दारी करत आघाडी धर्म पाळला नाही. त्यामुळे आपण राष्ट्रवादीला मदत करणार नसल्याचे स्पष्ट केले होते. आपले मुद्दे शरद पवार यांच्यासमोर मांडून समाधान झालं तर ठीक नाहीतर, वेळप्रसंगी स्वतःच्या पदाचा राजीनामा देत आघाडीविरोधात बंडाचा पवित्राही शेखर गोरे हे घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. तद्नंतर काल सायंकाळी बारामती येथील गोविंदबागेत शेखर गोरे यांनी शरद पवारांची भेट घेतली असून शेखर गोरे कोणती भूमिका घेणार? याकडे आता माण-खटाव तालुक्यासह माढ्यातील जनतेचे लक्ष लागून राहिले आहे. शिवसेना नेते शेखर गोरे यांची दोन दिवसापूर्वी युतीचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांनी भेट घेतली होती. मात्र ही आकस्मिक भेट असल्याचे सांगून यादरम्यान कोणतीही ठोस राजकीय चर्चा झाली नसल्याचे शेखर गोरे यांनी सांगितले होते. याचदरम्यान शेखर गोरे यांनी शरद पवारांची भेट घेऊन सुमारे सव्वा तास चर्चा केल्याने युती समोरील अडचणीत वाढ होण्याची शक्यता असून शेखर गोरे हे माण- खटावमधून रणजित निंबाळकर यांना मिळणारे लीड रोखू शकतात. त्यामुळे शेखर गोरे आणि शरद पवार यांच्या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
त्याचदरम्यान खटाव तालुक्यातील शेखरभाऊ गोरे प्रेमी युवकांचा संवाद मेळावा आज वडूज येथे सायंकाळी ०६ : ०० वा. आयोजित करण्यात आला असून या मेळाव्यात शेखर गोरे हे शरद पवार यांच्या भेटीनंतर आपली भूमिका स्पष्ट करतील अशी शक्यता आहे.