सातारा दि :महामानव व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून देशाला एक चांगला मार्गदाता दिलेला आहे. त्यामुळे देश प्रगतीपथावर येण्यासाठी महत्त्वाचा वाटा संविधानाने उचललेला आहे. अशा या महा मानवाचा आदर्श सर्वांनी घ्यावा. अशा शब्दात छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट वंशज श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांनी सातारा येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन केले.
सातारा नगरपालिकेच्या समोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पचक्र अर्पण करून त्यांनी प्रसारमाध्यमाशी संवाद साधला. या वेळेला प्रवीण धस्के, विजय बडेकर, अण्णा वायदंडे, सतीश रावखंडे, डॉ. अच्युत गोडबोले, ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप, सामाजिक कार्यकर्ते संतोष नलावडे आदी मान्यवर उपस्थित होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल बदनामी करणाऱ्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहिले. त्यांचा सहवास लाभला पाहिजे होता. पण, त्यांच्या विचाराचा सहवास आम्हाला नेहमीच मार्गदर्शक ठरलेला आहे. सर्व जाती धर्माचा विचार करून त्यांनी संविधानाची निर्मिती केली आहे. अफाट व्यक्तिमत्व असणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर व इतर युगपुरुषांची नेहमीच आठवण ठेवली पाहिजे. असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्व भारतीय शुभेच्छा दिल्या यावेळी मोठ्या संख्येने सातारा शहर व परिसरातील आंबेडकर अनुयायी यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय महात्मा ज्योतिबा फुले की जय या घोषणा देऊन युगपुरुषांचा जयजयकार केला तसेच सर्व धर्म समभावाची ही दृष्टी पाहण्यास मिळाली.




















