दहिवडी : ता.२४
रात्री नऊची वेळ…अंधाऱ्या रात्री काळेकुट्ट ढगांनी क्षणार्धात सगळं आकाश व्यापून टाकलेलं. काही कळायच्या आतच वेगवान सोसाट्याचा वादळी वारा सुरू झाला. त्याच दरम्यान वीजही गायब झाल्याने घाबरगुंडी उडाली. या वादळी वाऱ्याने गोंदवल्यातील लोकवस्तीत घातलेल्या धुमाकुळाने हाहाकार माजवला. या वाऱ्यात विशाल कट्टे यांच्या घरासमोरील झाड मोडून उभ्या असलेल्या कारवर कोसळले.घरासमोरच हे महाकाय झाड पडल्याने घरातून बाहेर निघायचा मार्गही बंद झाला.या वस्तीकडे जाण्यायेण्याचा मार्गच बंद झाल्याने लोक अडकून पडले . ही माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांना समजली आणि त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आपत्कालीन यंत्रणेशी संपर्क साधला…पण वेळेत धावून येईल ती यंत्रणा कसली? संबंधित यंत्रणेने तब्बल दोन तास सर्वांना ताटकळत थांबवलं आणि अखेर कायद्यावर बोट ठेवत हे काम आमचं नाही म्हणून जबाबदारीच झटकून टाकली.
त्यानंतर मात्र धैर्यशील पाटील यांनी तातडीने स्वखर्चातून जेसीबी बोलवला आणि ते घरासमोरील व कारवर पडलेलं झाड बाजूला काढत रहिवाश्यांचा मार्ग मोकळा केला. या झाडामुळे कारची काच फुटून गेलीच शिवाय इतरही मोठं नुकसान झाले. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष सागर कट्टे,अंगराज पाटील,श्रीकृष्ण कट्टे, प्रथमेश नवले, तुळशीराम कात्रे,श्रीकांत कट्टे,संदीप डोंबे यांच्यासह ग्रामस्थ व कार्यकर्ते उपस्थित होते.
या घटनेनंतर आपत्कालीन यंत्रणेच्या सतर्कतेबाबतचा प्रश्न मात्र अद्यापही उभाच आहे.आपत्कालीन परिस्थितीतही जबाबदारी टाकणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या या भ्रष्ट अधिकाऱ्यांना लवकरच धडा शिकवणार असल्याचं यावेळी धैर्यशील पाटील यांनी सांगितले.
