दहिवडी : ता.२४
माण तालुक्याला गुरुवारी सायंकाळच्या सुमारास वादळी पावसाचा जोरदार तडाखा बसला. यामध्ये तालुक्यात अनेक ठिकाणी मोठे नुकसान झाले असून काही ठिकाणी पाऊस कमी परंतु वारे वादळी स्वरूपाचं असल्याचे चित्र होते.
या वादळी वाऱ्यामुळे उत्तर माणमध्ये बऱ्याच ठिकाणी समाधानकारक पाऊस झाला. वातावरणात गारवा निर्माण झाला. मात्र वादळी वाऱ्याने काही ठिकाणी होत्याचे नव्हते केले. दहिवडी शिखर शिंगणापूर रोडवर असलेल्या वावरहिरे येथील मुख्य पुलालगत असलेल्या बाभळीच्या झाडांनी मुख्य रस्त्यावरच लोटांगण घातल्याने दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली होती. यावेळी वाहनधारकाने पर्यायी मार्ग काढत वावरहिरेच्या ओढ्यातून प्रवास केला. त्याचबरोबर वावरहिरे येथीलच पिसे वस्तीवरील हरिदास पिसे यांच्या जनावरांच्या गोठ्यावरील पत्रा उडून गेला.
दहिवडीमध्ये नगरपंचायतीच्या मागील बाजूस उभ्या केलेल्या घंटागाडीवर निरगिलीचे झाड कोसळल्याने गाडीचा चुरा झाला. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत ते झाड बाजूला केले.
रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ विजेचा खांबच रस्त्यावर पडल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. वाहनधारकांनी यावेळी शेजारी असणाऱ्या सनी ग्राउंडमधून प्रवास केला. पॉकेट कॅफेसमोरील झाडाची मोठी फांदी झुंबड हॉटेलच्या बोर्डवर पडली होती. त्याचबरोबर दहिवडी बसस्थानकाच्या पाठीमागून सिद्धनाथ मंगल कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर लिंबाचे झाड आडवे झाले होते. दहिवडी ते खांडसरी चौक मार्गावर विजेच्या तारा तुटून रस्त्यावर पडल्या होत्या.
दानवलेवाडी येथील जंबूबेट या ठिकाणच्या शेतात झाडाची फांदे खांबावर पडल्याने विजेचा खांब मोडून पडला. त्याचबरोबर विलास भोसले यांच्या शेळ्यांच्या शेडवरचा पत्र वाऱ्याच्या दणक्याने उलट्या छत्रीप्रमाणे झाला. शिखर शिंगणापूर ते गुप्तलिंग मार्गावर असणाऱ्या झाडांनीही वादळी वाऱ्याच्या दणक्यामुळे रस्त्यावर धाव घेतल्याने हा मार्गही प्रवासासाठी बंद झाला होता.
या वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी विजेचे खांब पडले. अनेक ठिकाणी मोठे नुकसान झाले. त्यामुळे वीज गायब होणे, हे साहजिकच होते. वीज गायब झाल्याने सर्वत्र काळोखाचे साम्राज्य पसरले होते. अनेक ठिकाणी वीज वितरणच्या माध्यमातून वीज सेवा सुरळीत करण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू असल्याची माहिती मिळत आहे. चौकट : १
दहिवडीचे नगराध्यक्ष सागर पोळ आणि नगरसेवक विशाल पोळ यांनी यंत्रणा हलवली!
रिलायन्स पंपाशेजारी असणारा विजेचा खांब रस्त्यावर पडल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. रात्रीचे अकरा वाजले होते. यावेळी दहिवडीचे नगराध्यक्ष सागर पोळ आणि नगरसेवक विशाल पोळ यांनी दहिवडीमध्ये फेरफटका मारत परिस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांनी वीज वितरणच्या अधिकाऱ्यांना फोन करून कर्मचाऱ्यांना तात्काळ रिलायन्स पंपाशेजारील रस्त्यावर पडलेला विजेचा खांब बाजूला करण्यासाठी पाचारण केले होते. त्यामुळे नगराध्यक्ष आणि विशाल पोळ यांनी रात्रीच यंत्रणा हलवल्याची चर्चा रंगली होती.
चौकट : २
सगळीकडे काळोखाचे साम्राज्य मात्र दहिवडीच्या महावितरण कार्यालयात मात्र लखलखाट!
दहिवडीसह माण तालुक्याच्या ज्या भागात वादळी वाऱ्याने तडाखा दिला त्या भागातील वीज गायब होती. मात्र दहिवडीच्या महावितरण विभागाच्या कार्यालयात लखलखाट दिसत होता. यावेळी महावितरणच्या कार्यालयात सगळी व्यवस्था चोख असते. स्वत:चे कार्यालय सोडले तर ठिकाणी व्यवस्थित वीज सेवा पुरवण्यात महावितरणला अपयश आल्यानेच सर्व ठिकाणी नुकसान होऊन वीज गायब झाली असल्याची चर्चा सर्वसामान्य लोकांमध्ये रंगली आहे. तसेच लोकांमधून महावितरणच्या कामावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
चौकट : ३
भारतीय हवामान विभागाचा अंदाज ठरला खरा!
काल सकाळी भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा क्षेत्र निर्माण झाले आहे. त्या ठिकाणी चक्रीवादळाची निर्मिती होत असल्याबाबत माहिती देण्यात आली होती. त्यानुसार किनारपट्टी लगत ६० ते ७० किमी ताशी वेगाने तर महाराष्ट्रात सुमारे ५०ते ६० किलोमीटर प्रति ताशी वेगाने वारे वाहणार असल्याचा अंदाज ही हवामान विभागाच्या माध्यमातून वर्तवण्यात आला होता. तो अंदाज खरा ठरल्याचे माण तालुक्यातील लोकांनी चांगलेच अनुभवले.