गोंदवले : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर सेवेकर्यांच्या उपस्थितीत गोंदवले बुद्रुक येथील श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज पुण्यतिथी महोत्सवाला सुरुवात झाली.
मंदिर परिसरातील मुख्य सभामंडपात श्रीरामनामाच्या जयघोषात कोठी पूजन करण्यात आले. गोंदवले बुद्रुक येथील श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचा पुण्यतिथी महोत्सव आजपासून सुरू झाला असून 8 जानेवारी रोजी समाधीवर गुलालाच्या उधळणीने सांगता होणार आहे. परंपरेनुसार शुक्रवारी सकाळी कोठी पूजन करण्यात आले. यावेळी विश्वस्तांच्या हस्ते श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या पादुका व प्रतिमेचे विधिपूर्वक पूजन करण्यात आले. त्यानंतर गोमातेचेही पूजन करण्यात आले. स्वयंपाकघरातील चुलींचे देखील पूजन करून भट्टी पेटविण्यात आली. मंदिर परिसरातील श्री ब्रह्मचैतन्य नामसाधना मंदिरात एक माळ जप करण्यात आला.
त्यानंतर समाधी मंदिरात श्रीकृष्ण पूजन करण्यात आले. त्यानंतर भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले. दरम्यान ब्रह्मानंद सभा मंडपात श्री महाराजांच्या पादुकांची भव्य प्रतिकृती साकारण्यात आली होती. स्वयंपाकघरातही भांड्यांची सुबक रचना करण्यात आली होती. मुख्य कोठीत अन्नधान्याच्या वस्तूंना फुलांनी सजविण्यात आले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या महोत्सवानिमित्त भरणारी यात्रा रद्द करण्यात आली असून समाधी मंदिरात सेवेकरी व कर्मचार्यांच्या उपस्थितीत रोजचे धार्मिक विधी करण्यात येणार आहेत.
शासनाच्या नियमांचे पालन करून भाविकांसाठी सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत तसेच 7 व 8 जानेवारी दिवशी भाविकांची गर्दी होऊ नये म्हणून मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. भाविकांनी घरीच पुण्यतिथी साजरी करण्याचे आवाहन मंदिर समितीने केले आहे.