महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी :कराड
पंतप्रधानांना निवेदन ; आरक्षण मिळवून देण्याची केली विनंती
मराठा आरक्षणाचा मुद्दा लोकसभेत मांडण्यासाठी गेली दोन दिवस नोटीस देऊन देखील वेळ मिळत नसल्याने अखेर खा. श्रीनिवास पाटील यांनी यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लेखी निवेदन दिले. यातून मराठा समाजात असलेल्या नाराजीकडे लक्ष वेधले असून महाराष्ट्र शासन व मराठा समाजाच्या बाजूने केंद्र सरकारने भूमिका घ्यावी अशी मागणी केली आहे.
सध्या लोकसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनासाठी खा. श्रीनिवास पाटील हे उपस्थित असून त्यांनी सभागृहात विविध प्रश्न उपस्थित केले आहेत. महत्वाचा असणारा मराठा आरक्षणाचा मुद्दा लोकसभेत मांडण्यासाठी गेली दोन दिवस नोटीस देऊन देखील त्यांना वेळ मिळत नसल्याने त्यांनी याबाबतचे लेखी निवेदन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्राच्या विधिमंडळाने मंजूर केलेल्या व मुंबई उच्च न्यायालयाने मान्य केलेल्या एसईबीसी आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या स्थगितीमुळे मराठा समाजात नाराजी आहे. यापुढे केंद्र शासनाने मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन प्रक्रियेत स्वतःहून सहभाग घेऊन महाराष्ट्र शासन व मराठा समाजाच्या बाजूने भूमिका घ्यावी. त्यामुळे मराठा आरक्षण मिळण्यासाठी अधिक पाठबळ मिळेल.
दरम्यान मराठा आरक्षण संदर्भात यापुढेही संसदेतील विविध नियमांचा वापर करून याबाबत बोलता यावे व मराठा समाजाची बाजू मांडता यावी यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.