लोणंद, दि.१०/ प्रतिनिधी
पाडेगाव ता फलटण येथील शिवेचामळा येथील तरूणाचा घरासमोरच झोपलेला असताना अज्ञात व्यक्तीने गळा चिरून खून केल्याची घटना घडली आहे.
लोणंद पोलीस स्टेशन हद्दीतील पाडेगाव ता.फलटण येथील शिवेचा मळा येथील राहुल नारायण मोहीते वय ३१ याचा रात्रीच्या वेळेस घराबाहेर खाटेवर झोपला असता अज्ञात व्यक्तीने धारधार हत्याराने मानेवर वार करून खुन केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. सदर घटनेची माहिती मिळताच लोणंद पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर व सहकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाबाबत सूचना दिल्या. या घटनेचा सातारा येथील फोरेन्सिक दलाकडूनही तपास करण्यात येत आहे. घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी पाठवण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद गणेश ऊर्फ निळकंठ नारायण मोहिते याने लोणंद पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.

मृत राहुल नारायण मोहीते हा अविवाहित असून पाडेगाव येथील शिवेचा मळा येथे आपल्या आईवडील मोठा विवाहीत भाऊ गणेश व त्याची पत्नी असा एकत्र कुटुंबात राहावयास होता. तो परीसरात सर्पमित्र म्हणून प्रसिद्ध होता. तसेच तो ड्रायव्हर म्हणून काम करत असे. त्याच्या बाबतीत असा प्रसंग घडल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत असून या घटनेबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.
































