पाटण : पाटण तालुक्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाला रास्त भाव मिळून त्यांचे आर्थिकमान उंचवण्यासाठी माजी विक्रमसिंह पाटणकर यांनी पाटण तालुका दूध उत्पादक संघाची निर्मिती केली आहे. संघ आजमितीस हजारो लिटरच्यावर दूध संकलन करत आहे. यापाठीमागे दूध संघाचे चेअरमन शंकरराव जाधव यांच्यासह व्हा. चेअरमन, सर्व संचालक, सभासद, शेतकऱ्यांचा मोलाचा हात आहे. तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी दूध उत्पादनाकडे वळून संघाला दूध घालून आपली व संघाच्या प्रगतीत योगदान द्यावे, असे आवाहन माजी सभापती व राष्ट्रवादीचे नेते सत्यजितसिंह पाटणकर यांनी केले.
पाटण तालुका सहकारी दूध उत्पादक प्रक्रिया संघ या संस्थेची 23 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे अध्यक्ष शंकरराव जाधव यांच्या अध्यक्षतेखाली संस्थाच्या कार्यालयात पार पडली. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी दूध संघाचे चेअरमन शंकरराव जाधव, व्हाईस चेअरमन शांताराम सूर्यवंशी, पंचायत समितीचे सभापती राजाभाऊ शेलार, पाटण अर्बन बॅंकेचे अध्यक्ष दिनकरराव घाडगे, शंकर शेडगे, गुरूदेव शेडगे, हणमंतराव सुतार यांची प्रमुख उपस्थिती होती.
सत्यजितसिंह पाटणकर पुढे म्हणाले, पाटण दूध संघाने शेतकऱ्यांच्या दुधाला योग्य भाव नेहमीच दिला आहे. पण सामाजिक बांधिलकी म्हणून आपद्ग्रस्तांनाही मदत केली आहे. आज सहकार चळवळ काहीनी मोडीत काढण्याचा प्रयत्न केला आहे. पाटण तालुक्यात आपण विविध संस्था उभारल्या. त्या संस्था आपल्या सर्व कार्यकर्त्यांनी सुस्थितीत चालवल्या आहेत. भविष्यातही संस्था चांगल्या चालवून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त फायदा देण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी करूया, असे त्यांनी सांगितले.
दूध संघाचे चेअरमन शंकरराव जाधव म्हणाले, संघाने 2020-21 मध्ये 52 लाख 36 हजार 750 लिटर एकून दूध संकलन केले आहे. तर एकूण उलाढाल 21 कोटी 25 लाख इतकी झाली असून ढोबळ नफा 84 लाख 50 हजार इतका झाला आहे. दूध संस्थांना व उत्पादकांना प्रति लिटर 1.10 पैसे दूध दर फलकाची तरतूद करण्यात आली असून सेवकांना 30 टक्के प्रमाणे 13 लाख 57 हजाराची तरतूद करण्यात आली आहे. दूध संस्थांच्या सचिवांकरीता एक पगार एवढी बोनस रकमेची तरतदूही केली आहे. तसेच संस्थांना मिल्कटेस्टर संगणक, कडबा कुट्टी मशिन यासाठी 1 लाख 90 हजाराचे अनुदान वाटप केले आहे. सामाजिक बांधिलकीतून जळीतग्रस्तांना 15 हजार 600 ची आर्थिक मदत केली आहे. दूध संघ या वर्षात ताशी 5 हजार लिटर क्षमतेचा गलायकोनमेड शीतकरण प्रकल्प उभारणार असून नवीन बॉयलर (हॉट वॉटर) प्रकल्प उभारणार आहे. संस्थांच्या प्रतिनिधींनी दूध संघाचे मा. विक्रमसिंह पाटणकर सहकारी दूध उत्पादन प्रक्रिया संघ लि. पाटण असे नामकरण हे संघाच्या येणाऱ्या रौप्यमहोत्सवी (25 वर्षे) वर्षात करण्याचा ठरावही पारित करण्यात आला आहे. सत्यजित पाटणकर यांच्या प्रयत्नातून उभारलेल्या कोविड सेंटरसाठी संघाने 2.50 लाखाची मदतही केली आहे. तसेच 25 हजार रुपयांचे सॅनिटायझर खरेदी करून वाटप केले आहे. माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर व माजी सभापती सत्यजितसिंह पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली दूध संघाची यशस्वी घोडदौड चालू आहे. त्यांच्या सहकार्यामुळेच संघ प्रगतीपथावर असून स्थापनेपासून आजपर्यंत संघाला अ ऑडीट वर्ग मिळाला असल्याचे त्यांनी सांगितले.
संचालक सुभाषराव पवार यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. व्यवस्थापक शिवाजी सूर्यवंशी यांनी अहवाल वाचन केले. संचालक सुंदर पुजारी यांनी आभार मानले. वार्षिक सभेला दूध संघाचे संचालक आप्पासाहेब मोळावडे, अशोक मोरे, विकास शिलवंत, आबासाहेब शिंदे, सुंदर पुजारी, रघुनाथ दंडीले,आक्काताई काळे, विठ्ठल जाधव, अच्युत कदम यांच्यासह दूध उत्पादक शेतकरी उपस्थित होते.