राज्य समन्वयक तथा सचिवपदी मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा जी सी यांची नियुक्ती
सातारा, दिनांक 26: जिल्हा परिषद शिक्षकांची बदली प्रक्रिया संगणकीय प्रणालीद्वारे व्यवस्थित पार पाडण्याकरिता संगणकीय आज्ञावली म्हणजेच सॉफ्टवेअर तयार करण्याकरिता शासनाच्या ग्रामविकास विभागाने विशेष समिती स्थापन केली आहे. या समितीचे अध्यक्ष, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद असून समितीच्या राज्य समन्वयक तथा सचिवपदी सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा जी सी यांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेतर्फे एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे. चंद्रपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, वर्धा जिल्हा परिषदेचे सचिन ओंबासे तसेच बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार हे या समितीचे सदस्य असतील .जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत व आंतरजिल्हा बदल्या या ऑनलाइन प्रणालीद्वारे करण्याचे सुधारीत धोरण निश्चित करण्यात आलेले आहे. त्या अनुषंगाने ही समिती कामकाज करेल. जिल्हा परिषद शिक्षकांची बदली प्रक्रिया राबविण्यासाठी संपूर्ण संगणक प्रणाली तयार करण्यात येईल.
संगणकीय प्रक्रियेसाठी लागणाऱ्या रकमेचे अंदाजपत्रक तयार करणे तसेच; या अंदाजपत्रकाप्रमाणे निधीची मागणी शासनाला करणे ही कामे ही समिती करणार असून जिल्हा परिषद शिक्षकांच्या आंतरजिल्हा व जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया साठी निविदा प्रक्रिया राबविणे आणि ही प्रक्रिया करत असताना सातारा जिल्हा परिषद महा आय टी ,एन आय सी, सी-डॅक इत्यादी संस्थांची मदत घेण्यात येणार आहे. तसेच या संगणक प्रणालीची चाचणी देखील ही समिती करेल. जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदली प्रक्रियेसाठी तयार करण्यात आलेल्या या संगणक प्रणालीचा प्रत्यक्ष वापर करावा असे देखील या आदेशात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.