बंद काळात फळे व पाणी उपलब्ध करून सुसह्य केला ताण
सातारा/ प्रतिनिधी : जालना येथील लाठीमाराच्या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती आंदोलनाच्या आवाहनानुसार साताऱ्यामध्ये सोमवारी पुकारण्यात आलेल्या बंदच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्तावरील पोलीस बंधू-भगिनींना रयत स्वाभिमानी संघटनेतर्फे फळे व पाण्याच्या बाटल्यांची भेट देऊन त्यांचा बंदोबस्ताचा ताण सुसह्य करण्याचा प्रयत्न केला. बंद काळात शहरांमध्ये शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांप्रती जिव्हाळा जपण्याचा रयत स्वाभिमानी संघटनेच्या प्रयत्नांचे सर्वत्र कौतुक होत आहे.याबाबत अधिक माहिती अशी की , मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून जालना जिल्ह्यात मराठा क्रांती आंदोलनाच्या कार्यकर्त्यांवर झालेल्या लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ सोमवारी साताऱ्यात बंदचे आवाहन करण्यात आले होते. सातारकर नागरिक व व्यापारी मंडळींनी सर्व व्यवहार बंद ठेवले व उत्स्फूर्तपणे कडकडीत बंद पाळला. संवेदनशील शहर असल्याने बंद काळात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलीस व अन्य फौजफाट्याने कडेकोट कर्तव्य बजावले. मात्र बंदोबस्तादरम्यान त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून रयत स्वाभिमानी संघटनेच्या माध्यमातून प्रदेशाध्यक्ष सागरदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हाध्यक्ष सुशीलभाऊ कदम यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस बंधू-भगिनी यांना फळे व बिसलेरी पाण्याच्या बाटल्या भेट देण्यात आल्या.
रयत स्वाभिमानी संघटनेने मोठ्या आपुलकीने आपली काळजी घेतल्याबद्दल बंदोबस्तावरील पोलीस कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
या उपक्रमावेळी जिल्हाध्यक्ष सुशिलभाऊ कदम, जिल्हाउपाध्यक्ष सुमितभाऊ साळुंखे, कार्याध्यक्ष तथा प्रवक्ता आयु संदीप जाधव, जिल्हा कामगार संघटना जिल्हाध्यक्ष सागरभाऊ पवार, तालुकाध्यक्ष तेजस काकडे , शहराध्यक्ष अभिदादा बनसोडे आणि वाहतूक संघटना आघाडी जिल्हाध्यक्ष योगेश साळुंखे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.