पायाभूत सुविधांमुळे विकासाला चालना : खा.श्रीनिवास पाटील
महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी : नागरिकांना रस्ते, वीज, पाणी, आरोग्य या पायाभूत सुविधा पोहचवण्यासाठी प्रयत्नशील असून पुनर्वसनाचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन खा.श्रीनिवास पाटील यांनी दिले. खासदार श्रीनिवास पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना सन 2021-22 अंतर्गत मंजूर झालेल्या वांग मध्यम प्रकल्प (ता.पाटण) अंतर्गत कराड तालुक्यातील पुनर्वसित घारेवाडी व कोळे येथील अंतर्गत रस्ते व पोहोच रस्ता करणे, आर.सी.सी.पाईप नलिका मोरी बांधणे, शवदाहिनी संचाचा पुरवठा करुन बसविणे अशा विविध विकासकामांसाठी 2 कोटी 49 लक्ष 40 हजाराचा निधी मंजूर झाला आहे. त्याच्या भूमिपूजन कार्यक्रम प्रसंगी कोळे ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीच्या आयटी सेलचे प्रदेशाध्यक्ष सारंग पाटील, कार्यकारी अभियंता सुरेन हिरे यांची प्रमुख उपस्थिती होती. खा.श्रीनिवास पाटील म्हणाले, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना अंतर्गत राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाकडून पुनर्वसित गावठण कोळे साठी 1 कोटी 44 लक्ष 56 हजार, तर पुनर्वसित गावठाण घारेवाडी साठी 1 कोटी 4 लक्ष 84 हजाराचा निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे येथील अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली कामे मार्गी लागून नागरीकांना सोयीसुविधा उपल्ब्ध होणार आहेत.
पुनर्वसन लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन पातळीवरून कार्यवाही सुरू आहे. त्यासाठी प्रयत्नशील असून पायाभूत सुविधांमुळे स्थानिक विकासाला चालना मिळेल. प्रारंभी प्रास्ताविक नम्रता कुंभार यांनी केले, तर आभार पांडुरंग कुंभार यांनी मानले. यावेळी पाटण पंचायत समितीचे उपसभापती प्रतापराव देसाई, सहाय्यक अभियंता हर्षवर्धन भोसले, दिलीप कोळेकर, अशोकराव पोतलेकर, विलास शेळके, जी.आर.कुंभार, दिप शिंदे व ग्रामस्थ उपस्थित होते.