महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी : शहाजीराजे भोसले (कळंब-इंदापूर)
ग्रामीण भागातील आरोग्य विभागाचा कणा म्हणून ओळखल्या जात असलेल्या आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांच्या मोबदल्यात वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला . या संदर्भात आरोग्य विभागाने शासन निर्णय जाहीर केला . हा वाढीव मोबदला १ जुलै पासून ग्राह्य धरला जाणार आहे . आशा स्वयंसेविकांच्या मानधनात वाढ करण्यासाठी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पुढाकार घेतला होता .

ग्रामीण भागात आशा स्वयंसेविका ७४ प्रकारचे विविध कामे करतात . त्याचा त्यांना कामानुसार मोबदला मिळतो मात्र राज्य शासनाकडून २००० रूपये कायमस्वरूपी मानधन देण्याचा निर्णय मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता .यासंबंधी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आग्रही भुमिका मांडली होती त्याला यश मिळाल्याची भावना व्यक्त केली जात आहे .आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या शासन निर्णयात नमूद केले आहे कि , आशा स्वयंसेविकांना केंद्र शासनाकडून नियमित ४ कामांसाठी प्राप्त होणारे मोबदल्याच्या समप्रमाणात कमाल २००० रूपयांपर्यंत दरमहा तसेच गटप्रवर्तकांना दरमहा ३००० रूपये राज्य शासनाच्या निधीतून देण्यात येणार आहेत .























