सुसंवादाचा अभाव
तुर्तास बास..!
मधुसूदन पतकी
एकमेकांकडे हेलपाटे मारण्यात सत्ता टिकवणे हे उद्दिष्ट साध्य करत असताना दोन दिवसांमध्ये ज्यांच्या करता सत्ता ताब्यात ठेवायची आहे त्या जनतेचे अंशतःतरी कल्याण व्हावे ही अपेक्षा आहे .
एका मराठी चित्रपटात मधे गाणं आहे . सध्याच्या राजकीय परिस्थितीला त्यातल्या काही ओळी अत्यंत चपखलपणे लागू होतात . ओळी आहेत, झुलवायचं झुलवायचं की नुस्तच फुलवायचं.. शिंगरू मेलं हेलपाट्यान असं नाही ना व्हायचं
सध्याची राजकीय परिस्थिती काहीशी अशीच आहे . राज्याचं अधिवेशन अगदी हाकेच्या अंतरावर आलेला आहे . हे अधिवेशन पार पडावे म्हणून मोर्चेबांधणी सुरू झाली आहे .अधिवेशन केवळ दोन दिवसांचे आहे . पण दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत धावपळ सुरू असलेली पाहायला मिळते आहे. अधिवेशन ही सत्तारुढ पक्षाची अग्निपरीक्षा असते . त्यातून विरोधक जर एकदा सत्तेत राहून विरोधी पक्ष झाला असेल तर फारच धोकादायक समजायला हवा . भारतीय जनता पक्षात इतर पक्षांच्या तुलनेत अभ्यासू , वक्तृत्व कौशल्य असणारे आणि आपले म्हणणे प्रभावीपणे मांडणारी मंडळी आहेत . सबब फ्लोअर मॅनेजमेंट असो इनहाऊस कीपिंग असो त्यासाठी महाआघाडीतील पक्ष्यांना धावपळही करावीच लागणार आहे . आणि ती तशी सुरू झाली आहे . एकमेकांकडे हेलपाटे मारण्यात सत्ता टिकवणे हे उद्दिष्ट साध्य करत असताना दोन दिवसांमध्ये ज्यांच्या करता सत्ता ताब्यात ठेवायची आहे त्या जनतेचे अंशतःतरी कल्याण व्हावे ही अपेक्षा आहे .
सध्याची राजकीय परिस्थिती पहाता सामोपचार , संवाद ,सुसंवाद , सत्तेत सातत्य राखणे यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत . करावे लागणार आहेत. मग त्या महाविकास आघाडीचे कर्तेधर्ते राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष श्री.शरद पवार आणि त्यांचे सहाय्यक शिवसेनेचे खा. संजय राऊत यांच्या दिल्लीवारी , वर्षा , मातोश्री , सिल्व्हर ओक अशा फेर्या सरकार किती अलबेला आहे हे दाखवतात.
अध्यक्षपदाचा तिढा
पाच जुलैपासून विधानसभेचे अधिवेशन सुरू होत आहे या अधिवेशनात भारतीय जनता पक्ष आक्रमक होत सत्ताधाऱ्यांना खिंडीत पकडता झाला तर त्यातून सुटण्याचा मार्ग शोधण्यासाठी ही खटपट सुरू आहे हे सांगायला ज्योतिषाची आवश्यकता नाही . सत्ता सांभाळण्याच्या नादात विधान सभेतील अध्यक्षाची जागा रिकामी आहे याचे भान सत्ताधाऱ्यांना नक्कीच असेल . तो एक तिढाच असेल. राष्ट्रवादीचे अध्यक्ष श्री. पवार हा गुंता , तिढा सोडवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटतात . ज्या पक्षाचा म्हणजेच काँग्रेसचा अध्यक्ष होणार आहे त्या पक्षाचा मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांच्याशी संवाद झालेला दिसत नाही. ज्यांनी श्री. ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावर ‘ बसवले ‘ त्या श्री. पवार यांच्याशी काँग्रेसच्या नेत्यांची दिल्लीत बातचीत होते . पण राज्यातल्या काँग्रेसला दिल्लीश्वर आणि सेना , राष्ट्रवादी बेदखल करतात . श्री . नाना पटोले यांना दिल्लीत बोलावून जो ‘ मंत्र ‘ दिला त्यामुळे पटोले यांना काँग्रेसची भूमिका मांडताना होणारी ओढाताण लक्षात येते . काँग्रेसचे राज्यातील नेते आणि उर्वरित दोन पक्ष यांच्यात कितपत गोंधळ आहे आणि संवाद आहे हे ही अधोरेखित होते. श्री . नाना पटोले आघाडी सरकारमध्ये राहू इच्छितात का हाच मुळात त्यांच्या वक्तव्यावरून प्रश्न निर्माण होतो . श्री . पटोले यांना महाराष्ट्रात केवळ भाजप विरोधातच नव्हे तर राष्ट्रवादी काँग्रेस विरोधातही मोर्चेबांधणी करायची आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसला नामोहरम केले तर शिवसेनाही बॅकफूटवर जाईल असा त्यांचा अंदाज असावा असे त्यांच्या पवित्र्यावरून दिसते.
सुसंवाहाचा अभाव
महा विकास आघाडी निर्माण करण्यात श्री .शरद पवार यांना मदत करणारे खा. संजय राऊत , श्री. बाळासाहेब थोरात , श्री . अशोक चव्हाण आदी मंडळी यांच्यातही फारसे सुसंवादी वातावरण दिसत नाही . राज्याच्या प्रश्नांबाबत तिन्ही पक्षांनी समिती स्थापन केली आहे .या समितीद्वारे ते प्रश्न सोडवतात . पण एकमेकांशी असणाऱ्या संबंधात गोडवा निर्माण व्हावा म्हणून कोणी कष्ट घेताना दिसत नाही . केवळ ही महाआघाडी टिकवण्याची जबाबदारी . शरद पवार आणि त्यासाठी हेलपाटे मारणाऱ्या खा. राऊत यांच्यावरच असल्याचे सकृतदर्शनी दिसत आहे . राज्यातील प्रश्न सोडवण्याची समिती म्हणजे पक्ष्यांमध्ये सुसंवाद निर्माण करण्याची समिती किंवा मास्टर की नाही . भांड्याला भांडे लागणारच , असे खा. राऊत म्हणत असतील , तर समितीच्या चर्चेत सदस्यांचा वेळ भांडी सांभाळण्यातच घालवावा लागत असेल असे वाटते . खा. संजय राऊत यांच्या भूमिका या पक्षाध्यक्ष श्री. उद्धव ठाकरे यांच्या भूमिका असतील असे गृहीत धरले तरी या भूमिकांवर शिवसेनेतल्या अनेकांची फारशी सकारात्मक प्रतिक्रिया नाही . बऱ्याच जणांची प्रतिक्रिया मौनं सर्वार्थ साधनम् अशीच आहे . नाराजी व्यक्त करायची नाही अशी आहे. श्री . राऊत यांचे बोलणे आणि वर्तन यावर आघाडीतल्या अनेकांचा आक्षेप आहे . कधी ना कधी ही धुसफूस स्फोटात परावर्तित झालेली पाहायला मिळेल ; अथवा श्री. राऊत यांना मौन बाळगण्यास सांगितले जाईल. अशी शक्यता वाटते .
अधिवेशन नाट्य
या सगळ्या पार्श्वभूमीवर अधिवेशन घेण्याचे नाट्य शासनाला पार पाडायचे आहे . तसे पाहायला गेले तर अधिवेशन दोन दिवसांसाठी बोलवण्यात आले आहे . या दोन दिवसात मराठा- ओबीसी आरक्षण , शिक्षणाचे , महत्त्वाचे म्हणजे आरोग्यविषयक परिस्थिती, कृषि क्षेत्र , वाजे प्रकरण , आमदार श्री. देशमुख यांचा राजीनामा प्रकरण या सगळ्यावर विरोधी पक्षाला चर्चा करायची आहे . यासाठी केवळ दोन दिवसांचा कालावधी अत्यंत अपुरा आहे . कालावधी वाढवावा अशी मागणी विरोधी पक्षाने राज्यपालांकडे केली . आहे हा कालावधी अपुरा आहे ; याची जाणीव सत्तारूढ पक्षालाही आहे . मात्र आरक्षण , कृषी क्षेत्र , आरोग्य विषयक धोरण यावर बोलण्यापेक्षा न बोललेले व न ऐकलेले बरे असा पवित्रा सत्तारूढ पक्षाचा असेल. शिवसेनेच्या शिवबंधनात एकनिष्ठेची खात्री पक्षप्रमुखांना देता येत नसल्याने , त्यांनी मंगळवारी व्हिप जारी केला . मात्र ज्यांच्या पासून धोका आहे ; जे बोलतात एक आणि करतात वेगळेच , भूमिका तिसरी घेतात अशा राष्ट्रवादीने हा लेख लिहून होईपर्यंत व्हीप जारी केला नव्हता . कृषी विषयक बिलांवर संसदेत बोलण्याची वेळ होती तेव्हा मुंबईत महत्त्वाच्या चर्चेसाठी यायचे व बिल मंजूर झाल्यावर त्याविरोधात दिल्लीतल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा द्यायचा हा हा दुतोंडीपणा करणाऱ्या राष्ट्रवादी पक्षाने खरेतर व्हिप जारी करायला पाहिजे . व्हिप जारी न करण्याची दोन कारणे असू शकतात. एक म्हणजे सगळे निष्ठावान आहेत. दुसरे तुम्हाला जेहवेने करा हा संदेश असू शकतो . या व्हिपमुळे कोणाला नव्हे तर मुख्यमंत्र्यांनाच राष्ट्रवादी आपल्यासोबत आहे , आपल्या धोरणांना पाठिंबा देतील ही खात्री होईल . खरा धोका भाजपकडून असण्यापेक्षा आपल्याच मंडळींकडून होऊ शकतो हे मुख्यमंत्र्यांनी लक्षात घेणे जरुरीचे आहे . राजकारणात कोणी कोणाचा कायम शत्रू व कायमचा मित्र असत नाही .त्यामुळे वारे कधी बदलेल व कोणत्या विधेयकाला कोण कधी पाठिंबा देईल हे सांगता येत नाही .
काँग्रेसवरही वचक?
खरेतर काँग्रेस पक्षाला या दोन दिवसांच्या अधिवेशनात आपल्या पक्षाच्या परंतु राष्ट्रवादीवर वचक ठेवणाऱ्या अध्यक्षाची निवड करायची आहे . अनेक नावां बद्दल चर्चा होत आहे . राष्ट्रवादीला अडचणीचे ठरणारे , लकवा तज्ज्ञ नाव माजी मुख्यमंत्री श्री. पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव आहे .याशिवाय श्री. संग्राम थोपटे यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडणे हेसुद्धा राष्ट्रवादीला डोकेदुखीचे ठरू शकते . थोडक्यात शिवसेनेबरोबर राष्ट्वादीला ; काँग्रेसलाही नियंत्रणात ठेवायचे आहे. आणि हे राष्ट्रवादीचे सध्याचे महत्त्वाचे उद्दिष्ट असेल . एक छुपा अजेंडा असेल तेव्हा तूर्तास .!
मधुसूदन पतकी