फलटण प्रतिनिधी – शहरातील व तालुक्यातील मान्सूनपूर्व वीज वाहिन्यांच्या दुरुस्तीच्या कामांना मान्सून दाखल होण्यास काही दिवस राहिले असतानाही सुरुवात झालेली नसून महावितरण च्या दुर्लक्षित कारभारामुळे येणारा पावसाळा हा विजेच्या लपंडावात जाणार आहे. विविध प्रकारच्या कारणामुळे सतत चर्चेत असणारे महावितरण फलटण विभागीय कार्यालय सध्या मान्सूनपूर्व वीज दुरुस्तीची कामे न केल्याने चर्चेत आहे.
अवकाळी पाऊस व त्यानंतर लगेचच सुरू होणारा पावसाळा वीज ग्राहकांना सुसह्य व्हावा यासाठी सध्या वीजतारांमध्ये अडकलेले पतंग, मांजा, वाढलेल्या झाडांच्या फांद्या याचाही फटका महावितरण यंत्रणेला बसत असतो. याशिवाय सैल झालेले गार्डिंग व स्पॅन घट्ट करणे, दोन खांबांमधील झोल पडलेल्या तारा ओढून घेणे, सर्व खांब आणि त्यांचे ताण सुस्थितीत करणे हे काम महावितरण ने करणे अपेक्षित आहे. शहरातील व तालुक्यातील वीजतारांमध्ये अडकलेले पतंग, मांजा, वाढलेल्या झाडांच्या फांद्या तत्काळ दूर करण्याची गरज आहे.
वीज रोहित्रांमधील तेलाची योग्य पातळी राखणे. रोहित्रांचे अर्थिंग मजबूत करणे, पोल, वितरण पेट्या, फिडर पिलर्स, मिनी फिडर पिलर्स या सर्वांचे अर्थिंग सुस्थितीत करणे. फांद्या तोडणे, पोलवर वाढलेल्या वेली काढणे, ट्रान्सफॉर्मर लगत वाढलेली झुडपे तोडणे, फुटलेले पीन आणि इंसुलेटर बदलणे, तपासणी व दुरुस्त करणे, वाहिनींचे खराब झालेले लाईटनिंग अरेस्टर बदली करणे, भूमिगत वाहनांचे तात्पुरती असलेले जॉईट कायमस्वरूपी करणे, वाहिन्यांचे खराब झालेले जंपर बदली, जीर्ण झालेल्या वायर बदल, जळालेल्या तुटलेल्या वायर बदल आदी मान्सूनपूर्व देखभाल व दुरुस्तीची कामे मे महिन्याच्या उत्तरार्धातच केली जाणे आवश्यक असताना अद्यापही याबाबत फलटण महावितरण विभागीय कार्यालय यांच्याकडून कागदोपत्रीच कार्यवाही सुरू असून प्रत्यक्षात कोणत्याही प्रकारची उपाययोजना होताना दिसत नाही.
महावितरणच्या वीज वितरण यंत्रणेतील बहुतांश सामग्री ही उघड्यावर असल्याने वातावरणात होणाऱ्या बदलाचा प्रतिकूल परिणाम वीज वितरण यंत्रणेवर होत असतो व पर्यायाने त्याचा परिणाम ग्राहक आणि ग्राहक सेवांवर होत असतो. यामुळे उन्हाळा व त्यानंतर लगेच सुरू होणारा पावसाळा हा वीज ग्राहकांना सुसह्य व्हावा यासाठी मान्सूनपूर्व कामे महावितरणने जलद गतीने करणे आवश्यक असताना अद्यापही फलटण महावितरण विभागीय कार्यालय व सर्व उपविभागीय कार्यालय कोणत्याही प्रकारची उपाययोजना करताना दिसत नाही
शहरातील अनेक भागात अद्यापही सतत वीज जाण्याचे प्रमाण अधिक वाढले असून लवकरात लवकर मान्सूनपूर्व वीज वाहिन्यांच्या दुरुस्ती न केल्यास पावसाळ्यात वीज खंडित होण्याचे प्रमाण वाढणार आहे. यापूर्वी पावसाळ्यापूर्वी वीज वाहिन्यांच्या दुरुस्तीची कामे होत होती मात्र मागील दोन वर्षापासून महावितरण विभागीय कार्यालय व उपविभागीय कार्यालय याठिकाणी नवीन अधिकारी आल्यापासून वीज व्यवसथापनाबाबत दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत असल्याचा आरोप नागरीक मोठ्या संख्येने करत आहेत.
संतश्रेष्ठ श्री ज्ञानोबा माऊलीची पालखीचे जुलै महिन्यात फलटण तालक्यात आगमन होणार असून याकरीता ही पावसाळ्यापूर्वीच वीज व्यवसथापनाबाबत व दुरुस्ती होण्याची आवश्यकता असते पावसाळा सुरू झाल्यास कोणत्याही वीज दुरुस्ती व देखभाल करण्यासाठी वेळ व वातावरण नसल्याने यावर्षी पालखीत विजेचा बोजवारा उडण्याची शक्यता नाकारता येत नाही. किमान येणाऱ्या काही दिवसात फलटण महावितरण विभागीय कार्यालय व सर्व उपविभागीय कार्यालयातील अधिकाऱ्यांनी खुर्ची सोडून प्रत्यक्ष जागेवर जाऊन काम करण्याची आवश्यता आहे नाहीतर येणारा पावसाळा वीज ग्राहकांना त्रासदायक जावू शकतो. लाखो रुपयांचा वीज दुरुस्ती व देखभाल बाबतचा निधी काम न करता गायब झाला की काय अशी शंका नागरिकांनी उपस्थित केली आहे.
महावितरण चे अनेक अधिकारी फलटण मुख्यालयी राहत नसल्याने खंडित वीज समस्या दूर होत नसून फलटण शहरासह तालुक्यात सध्या वीज खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. नियमबाह्य मुख्यालय सोडून जाणाऱ्या अधिकार्यावर कारवाई करण्याची आवश्यकता आहे.
खंडित वीजबाबत महावितरण च्या अधिकाऱ्यांचे फोन सतत आऊटऑफ कव्हरेज लागत असल्याने महावितरण वीज सेवा आऊटऑफ कव्हरेज झाली आहे
ओळवीज वहिण्याची दुरुस्ती न केल्याने वीज वाहिणीलगत वाढलेली झाडे