महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी:
राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या मातोश्री शारदाताई अंकुशराव टोपे ,वय ७४ यांचे शनिवारी रात्री दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्यावर गेल्या महिन्याभरापासून बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. त्या कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ साखर कारखान्याच्या अध्यक्ष होत्या, त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, जावई, सुन, नातवंडे असा परिवार आहे. शारदाताईंवर गेल्या महिनाभरापासून बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. मार्चमध्ये देखील त्या महिनाभर ॲडमिट होत्या. बरे झाल्यानंतर त्या दोन महिने घरीच होत्या. मात्र पुन्हा त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना ॲडमिट करण्यात आले होते. शनिवारी
(१ ऑगस्ट २०२०) रात्री नऊच्या सुमारास त्याची प्राणज्योत मालवली.
कोरोनामुळे जिल्ह्यांचे आढावा दौरे, सततच्या बैठका यात वेळात वेळ काढून आरोग्यमंत्री टोपे आईला भेटायला हॉस्पिटलमध्ये जायचे. रोज सकाळी आईला भेटून दिवसाची सुरूवात ते करायचे. ती अजातशत्रु होती. एका शब्दानेही तिने कुणाला दुखावलं नाही. सर्वांना प्रेम दिले. माझ्या वडिलांच्यासोबत ती सावली सारखी राहिली. ४ वर्षांपूर्वी वडिल गेल्यानंतर ती आधार होती. दोन दिवसांपूर्वी तिने माझ्या पाठीवर दोन्ही हात ठेवत मला आर्शिवाद दिले. तो आशिर्वाद आता कायम माझ्या पाठीशी राहील, अशी भावना मंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केली.राज्यात गेल्या चार महिन्यांपासून कोरोनाची परिस्थिती समर्थपणे हाताळणाऱ्या आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचेवर आईच्या मृत्यूमुळे दुखाचा डोंगर कोसळला. राजेश टोपे यांच्या मातोश्रीच्या निधनाचे वृत्त कळताच अनेकांनी त्यांचे सांत्वन केले.