महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी /सुनील निंबाळकर : बारामती
सकाळी पहाटे अंधारात गाडीत बसून ऊस तोडायला जायचं अन संध्याकाळी कोपीवर आलं की परत उद्याच्या मार्गाची तयारी करायची हे नित्याचं ठरलेलं. पण आजचा दिवस जरासा वेगळा होता. आपलं पोरग डान्स करतय…भाषण करतय..गाणं म्हणतीये… हे सगळं बघून पालकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता. हे सगळं पाहून आई- वडील पोरांचं टाळ्यांची दाद देत कौतुक करत होती. औचित्य होते ते प्रजासत्ताक दिनाचे.
सोमेश्वर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात ऊसतोड कामगारांच्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शालेय शिक्षण विभाग महाराष्ट्र शासन व टाटा ट्रस्टस मुंबई, जनसेवा ग्रामीण विकास व शिक्षण प्रतिष्ठान आणि सोमेश्वर सहकारी साखर कारखाना याच्या सहकार्याने ‘आशा प्रकल्प काम करत आहे. मुलांना लेखन- वाचन वर्गातून अभ्यास वर्ग घेण्यात येत आहेत.
प्रजासत्ताक दिनाच्या निमित्त ऊस तोड मजुरांच्या मुलांचा सोमेश्वर कारखान्याच्या तळावर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमादरम्यान मुलांनी भाषण,गीत गायन,व डान्स सादर केले. कार्यक्रमादरम्यान मुलांनी सादरीकरण केलेल्या कलागुणांना दाद देण्यासाठी त्यांचे आई -वडीलासह कामगार उपस्थित होते.
कार्यक्रमा निमित्त अध्यक्षस्थानी उपस्थित असलेले सोमेश्वर कारखान्याचे संचालक विशाल गायकवाड म्हणाले की, इथं आपले आई- वडील काबाड कष्ट करत आहेत. आपल्यासाठी आशा प्रकल्पाच्या माध्यमातून अभ्यास घेतला जातोय. तुमच्या हातात कोयत्या ऐवजी पेन घ्या. आणि तुमचे चित्र हे शिक्षण बदलेले. कारखान्याच्या माध्यमातून सर्वोतोपरी मदत मिळवून देऊ.
कार्यक्रमा दरम्यान पी.एस.आय दत्तात्रय अलगुर, ऊसतोड कामगार कुटुंबातील सोमनाथ रंदवे यांनी मनोगत व्यक्त करत मुलाना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमासाठी सोमेश्वर कारखान्याचे संचालक विशाल गायकवाड, टाटा ट्रस्टचे अधिकारी परेश ज.म, मुंबई येथे कार्यरत असलेले पी. एस.आय दत्तात्रय अलगुर , प्रकल्प प्रमुख संतोष शेंडकर, चित्रपट सह दिग्दर्शक मिथुन चौधरी,पूजा डोळस, मुख्याध्यापिका गिताजली बालगुडे, समुपदेशक समीक्षा.सं.मि, आकाश सावळकर, हेमंत गायकवाड उपस्थित होते.
कार्यक्रमा दरम्यान मुरडेश्वर अर्बन बँकेचे देवकर, वाणेवाडी येथील प्रतीक जगताप , सौरभ जगताप यांनी दीडशे मुलांना जिलेबीचे वाटप केले.
तसेच लाटे, बजरंगवाडी येथे होमिनिस्टर चे आयोजन करण्यात आले होते. तर पुरंदर तालुक्यात पिंपरे, जेऊर, मांडकी, माहूर या ठिकाणी भाषण, रांगोळी, नृत्य सादरीकरण असे कार्यक्रम पार पडले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सोमेश्वर कारखाना तळाच्या ठिकाणी कार्यरत असलेले व बारामती, पुरंदर येथील आशाच्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.सोशल डिस्टन्स ठेवून कार्यक्रम संपन्न झाला.
प्रास्ताविक संतोष होणमाने यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थीनी अर्चना सुळे व आशा चे कार्यकर्ते ऋषीकेश जगताप यांनी केले.
गुणवतांचा सत्कार
कार्यक्रमा दरम्यान सैन्य दलात भरती झाल्याबद्दल वाघळवाडी मधील कन्नडवस्तीतील विशाल जावीर यांचा पाहुण्याच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच ऊसतोड कामगार मुलांना आरोग्य विभागाच्या माध्यमातून आरोग्य सेवा पोहचविण्यासाठी कार्यरत असलेले आरोग्य सेवक परवेझ मुलानी, आशा सेविका मालन साठे, शैला जाधव यांचा सन्मानपत्र व ‘आशा’ प्रकल्पाचे शिक्षण कोंडी पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला.