महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी : प्रतापसिंह भोसले (फलटण शहर)
‘वाचाल तर वाचाल’ ही म्हण आपण फार पूर्वीपासून वाचत आलेलो आहोत. ग्रंथ म्हणजे ज्ञानाचे भांडार असून ग्रंथालय म्हणजे ज्ञानाचे सागर होत. ते मानवाचे उत्तम गुरु व सच्चे मित्र आहेत. कधी कधी त्यांच्या महत्त्वाला रेडिओ, टीव्ही,मोबाईल,लॅपटॉप यांसारख्या दृक्श्राव्य साधनांमुळे आहोटी लागल्यासारखे वाटते, पण ज्ञानार्जनासाठी ग्रंथालयाइतका प्रभावी दुसरा पर्याय नाही. ग्रंथालये ही अक्षरवाड्.मयाची भव्य कोषागारे आहेत आणि ती सहज उपलब्ध असून अखंडपणे वाहत असणारी ज्ञानसरिता आहे. ग्रंथालयाची चळवळ देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत विस्तारित करण्याची आवश्यकता आहे. गाव तेथे ग्रंथालय हि उभी राहिलेली चळवळ टिकविण्याची गरज असल्याचे मत मुंबईच्या भारती सावंत यांनी व्यक्त केले. व पुढे सांगितले की , काही ग्रंथांचा आस्वाद घ्यायचा असतो , काही थोडे ग्रंथ वाचुन पचनी पाडायचे असतात.
याचाच अर्थ असा की काही पुस्तके केवळ मधून-मधून चाळायची असतात. ग्रंथाच्या वाचनाने मानवाला परिपूर्णता प्राप्त होते. वादविवादातून त्याला हजरजबाबीपणा प्राप्त होतो. लेखनामुळे त्याच्या अंगी तंतोतंतपणा बाणतो.पूर्वी मुलांना साहित्य, सामाजिक व नैतिक तत्त्वप्रणाली तसेच तत्त्वज्ञान व धर्म यांचे सुद्धा शिक्षण त्यांच्या बालवयातच आजीने सांगितलेल्या गोष्टीं- मधूनच मिळत असे. त्यामुळे मुले संध्याकाळ झाली की आजीच्या सभोवती घोळका करून बसत असत. परंतु संयुक्त कुटुंबपद्धतीमुळे आणि वैज्ञानिक संशोधनातील टीव्ही,संगणक, लॅपटॉप या माध्यमांमुळे त्या गोष्टी ऐकता व पाहता येतात.
परंतु भारतातल्या कितीतरी खेड्यात अजून वीजही पोहोचलेली नाही, त्यामुळे दूरदर्शन ,संगणकसारख्या वैज्ञानिक सोयीसुविधा तेथे पोहोचणे विरळच. म्हणून वाचनालय, ग्रंथालय असणे अत्यावश्यकच. ‘गाव तेथे ग्रंथालय’ या घोषवाक्यानुसार अगदी लहानात लहान गावापर्यंत ग्रंथालय चळवळ पोहोचणे आवश्यक आहे. ग्रंथालय हीच मानवी हृदयातील देवालये आहेत. देवाचिये द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्ती चारी साधियेल्या
जसे देवळाच्या पायरीवर उभे राहिल्याने देवाशी हितगूज साधता येते, तसे ग्रंथालयात डोकावल्याने त्यातील ज्ञानगंगेशी एकरूप होता येते. आपला देश खेड्यांचा आहे. नव्या योजना, राष्ट्राच्या गरजा, विकासाच्या योजना, तसेच जगातील चालू घडामोडींची माहिती ग्रामस्थांना असणे आवश्यक आहे. हे सर्व ज्ञान मिळाल्यावरच स्वतःच्या गावाचा विकास साधण्याच्या दृष्टीने ग्रामस्थ काही प्रयत्न करू शकतात. दूरदर्शन, संगणकसारख्या प्रसारमाध्यमांमुळे समाजाची अध्ययन क्षमता व व्यासंगी वृत्ती घटत चालली आहे. अशावेळी ग्रंथालय अधिकाधिक कार्यक्षम व लोकाभिमुख व्हायला हवीत. आपण प्रत्येक पुस्तक विकत घेऊ शकत नाही म्हणूनच गाव तेथे ग्रंथालय हे आपल्या शासनाचे धोरण आहे. अभ्यासक मंडळींना संदर्भासाठी ग्रंथाचा उपयोग होतो. ग्रंथालयात येणारी वर्तमानपत्रे, नियतकालिके यामुळे आपला वर्तमानाशी नेहमी संबंध राहतो. म्हणूनच ग्रंथालयांना ज्ञानाची पाणपोई असे म्हणतात.ज्या गावात ग्रंथालय आहे तेथे १५ ते २५ या वयोगटातील मुले ग्रंथालयाचा अधिकाधिक उपयोग करतात. त्या व्यक्ती अत्यंत संस्कारक्षम व व्यासंगी असतात. त्यांच्यात नितीमुल्ये रुजविण्यासाठी उत्तम ग्रंथ उपलब्ध करून देणे आवश्यक ठरते. त्यामुळेच गावातील अनुदान प्राप्त लहानात लहान ग्रंथालयात सुद्धा पाच मासिके व तीन वृत्तपत्रे घेणे सरकारने बंधनकारक केले आहे. ग्रामीण भागात ग्रंथालयांना उत्तेजन देण्यासाठी सरकारने उत्तम ग्रंथालयांना डॉक्टर आंबेडकर पुरस्कार देण्याची स्तुत्य योजना आखली आहे. त्यामुळे पुस्तकांच्या वाढलेल्या किमती लक्षात घेऊन सरकारने ग्रंथालयांच्या अनुदानात वाढ केली आहे. जो ज्ञानसागराची काळजी घेतो त्यांची काळजी घेऊन सरकारने ग्रंथपाल व इतर कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ करणे आवश्यक आहे.
मृतवत ग्रंथालयांना संजीवनी देऊन सुदृढ केले पाहिजे. “ज्ञानाचा वर्षाव करिती ग्रंथ गुरु माझ्यासाठी” “किती वेचावे ज्ञानकण झोळी भरावी जीवनासाठी” असे हे ग्रंथालय म्हणजे ज्ञानाचा सागर. त्यातील ज्ञानकण गोळा करताना आपले सर्व आयुष्य सरले तरी तो सागर आटणार नाही,संपणार तर नाहीच, उत्तरोत्तर वाढतच जाईल आणि आपण ते ज्ञानामृत पिताना अमर होऊन जाऊ. “ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते” याप्रमाणे आपणही आपल्या ज्ञानाचे कोठार सतत भरत जाऊ. म्हणूनच कार्लाईलने वर्तमानपत्री वाड्.मयाला “गुडघाभर पाणी” असे म्हटले आहे ते काय खोटे नव्हे. त्यामुळेच ग्रंथवाचन केव्हाही श्रेष्ठच ठरते .