मसूर /प्रतिनिधी : अनियमित पावसाने हैराण झालेल्या सातारा जिल्ह्यातील शेतकरी हुमणी आळीच्या प्रादुर्भावामुळे हैराण झाले आहेत. जिल्ह्यातील आडसाली ऊसासह भुईमूग, सोयाबीन आदी पिके हुमणीच्या हल्ल्याला बळी पडू लागले आहेत. पिके वाचविण्यासाठी शेतकरी विविध औषधांची फवारणी करत आहेत मात्र हुमणी आळी त्याला दाद देत नसल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. हुमणी किडीमुळे उसासह खरीप पिकांची वाढ खुंटली असून वरवर बघता किड दिसत नाही मात्र रोप उपसल्यावर मुळाशी हुमणी किड दिसून येत आहे. हुमणी किडीचा सर्वात मोठा फटका नगदी पीक असलेल्या ऊसाला बसत आहे. शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होणार असून साखर कारखाने लवकर सुरू करावेत अशी मागणी शेतकरी वर्गातून होऊ लागली आहे.
हुमनी आळी सुरुवातीस सेंद्रिय पदार्थावर जगतात आणि त्यानंतर त्या पिकांची मुळे खात आहेत. यामुळे उसासह सोयाबीन, भुईमूग आदी पिके सुरुवातीस पिवळी पडतात व त्यानंतर ही पिके वाळताना दिसत आहेत. उसासारख्या पिकांची मुळे नष्ट झाल्यामुळे रोप किंवा ऊस वाळतो यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. मोठ्या कष्टाने व वातावरणातील बदलाचा वेळोवेळी सामना करत जगवलेली पिके हुमणीच्या हल्ल्याला बळी पडत आहेत. उसासह विविध पिके वाचण्यासाठी शेतकरी बाजारात उपलब्ध असलेल्या विविध प्रकारच्या औषधांची फवारणी करत आहेत. मात्र हुमनी आळी त्याला दाद देत नसल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. यंदा पावसाच्या लहरीपणाचा विपरीत परिणाम खरीप हंगामातील पिकावर झाला असून शेतकऱ्यांनी वेळीच कीड यावर उपाय करण्याची आवश्यकता आहे. अन्यथा खरीप हंगामातील विविध पिकांचे मोठे नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे .बागायती जमिनीत घेतल्या जाणाऱ्या पिकात ओलावा व अन्नपुरवठा जास्त होत असल्याने यामध्ये हुमणीचा प्रादुर्भाव वाढत वाढत चालल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात हुमणीचा फटका ऊस पिकाला बसत आहे त्यामुळे खरीप हंगामातील विविध पिकांचे सरासरी उत्पादनात ५० टक्के पर्यंत नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अनेक ठिकाणी हुमनी मुळे उसाचे फड वाळू लागली आहेत यंदाचा साखर हंगाम लवकर सुरू करावा अन्यथा अनेक शेतकऱ्यांची उसाचे फड उध्वस्त होण्याबरोबरच शेतकर्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होऊन शेतकरी देशोधडीला लागतील अशी भीती शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे
कृषी विभाग व कारखान्यांनी सहकार्य करावे…..
बाजारात उपलब्ध असलेल्या विविध प्रकारच्या औषधांचा वापर करूनही हुमणी व नियंत्रण करणे शक्य होत नसल्याने यामध्ये शासनाच्या कृषी विभागाने शेतकऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन करणे आवश्यक आहे. तसेच ज्या-त्या क्षेत्रातील साखर कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना चांगल्या दर्जाची व अनुदानावर हुमणी व लोकरी मावा यांची औषधे उपलब्ध करून द्यावीत व योग्य मार्गदर्शन करावे अशी मागणीही शेतकरी वर्गातून होत आहे.