मुळगाव (श्रीगणेश गायकवाड), दि. 19 : कोयना धरण पाणलोट क्षेत्रात व परिसरात पावसाचा जोर कमी झाल्याने शिवाजी सागर जलाशयात येणाऱ्या पाण्याची आवकही मोठ्या प्रमाणात घटली आहे. त्यामुळे कोयना धरणाचे सहा वक्री दरवाजे बुधवार दि. 19 रोजी सकाळी 11 वाजता 10 फुटांवरून 5 फूट व तद्नंतर सायंकाळी 6 वाजता दीड फुटांवर कमी करण्यात आले आहेत. सध्या कोयना धरणात 31 हजार 37 क्युसेक्स प्रतिसेकंद पाण्याची आवक होत आहे. तर धरणातून 9 हजार 213 आणि वीजनिर्मितीनंतर पायथा गृहातून 2 हजार 100 क्युसेक्स असे एकूण 11 हजार 313 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे. विसर्ग कमी करण्यात आल्याने कोयना नदीची पाणी पातळी झपाट्याने कमी झाली असून चार दिवसानंतर कोयना नदीवरील मूळगाव व नेरळे पूल वाहतुकीसाठी खुले झाले आहेत. त्यामुळे हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येत आहे.दरम्यान, आगामी पूर्वतयारी व अजून दोन दिवस असलेला अतिवृष्टीचा संभाव्य इशारा लक्षात घेऊन धरण परिचलन सुचीप्रमाणे पाणीसाठा व पाणी आवक त्यापटीत कमी अथवा जास्त झाली तर धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचे प्रमाण कमी-जास्त करण्यात येईल, अशी माहिती कोयना सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता कुमार पाटील यांनी दिली आहे.पूर्वेकडील विभागातही पावसाचा जोर ओसरल्याने कोयना नदीच्या पाणी पातळीत थोड्या प्रमाणात घट झाली आहे. सर्व ठिकाणी धोका पातळीच्या खाली पाणी पातळी आली आहे. अनेक पूल, बंधारे हे चार दिवसानंतर पाण्याबाहेर आले आहेत. काही ठिकाणी पाऊस व त्यामुळे नदी, ओढ्यांना आलेल्या फुगीमुळे आजूबाजूच्या शहर, गाव, नागरीवस्त्या व शेतांमध्ये घुसलेल्या पाण्याचे प्रमाण कमी झाले आहे.बुधवारी कोयना धरणांतर्गत विभागासह पूर्वेकडील विभागातही पावसाचा जोर ओसरला आहे. धरणातील छोट्या नद्या, नाले, ओढे, धबधबे यातून येणाऱ्या पाण्याचे प्रमाणही काही प्रमाणात कमी झाले आहे. यात काही तासात येणाऱ्या पाण्याचे प्रमाण हे कमी तर काही तासात ज्या पटीत पाणी सोडले जाते त्याच पटीत पाण्याची आवक होत आहे. सरासरी येणारी आवक कमी झाल्याने धरणातील एकूण पाणीसाठ्यात थोडी घट झाली आहे. सध्या धरणात एकूण 91.21 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. धरणात आवश्यक तो पाणीसाठा करून आगामी काळातील पाऊस व त्यानंतरची पाणी सामावून घेण्याची क्षमता विचारात घेऊन त्यानंतरच सोडण्यात येणाऱ्या पाण्याचे प्रमाण कमी अथवा जास्त केले जाणार आहे. बुधवार सकाळी 8 ते सायंकाळी 6 पर्यंत कोयनानगर येथे 11 मिलीमीटर (3687), नवजा 13 (4188), महाबळेश्वर 20 (4110) मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर पश्चिम घाटातील अतिपर्जन्यवृष्टी क्षेत्रातील प्रतापगड येथे 21 (3667), सोनाट 13 (3018), बामणोली 8 (2592), काठी 8 (2635) मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. जलाशयातील पाणीपातळी 2152.07 फूट व 656.107 मीटर इतकी झाली आहे. सध्या धरणात 91.21 टीएमसी पाणीसाठा झाला असून उपयुक्त पाणीसाठा 86.08 टीएमसी आहे. कोयना धरण 86.66 टक्के भरले आहे. तर धरणाचे सहा वक्री दरवाजे दीड फूटावर असून त्यातून 9 हजार 213 व पायथा वीजगृहातील दोन जनित्राद्वारे वीजनिर्मिती करून 2 हजार 100 असे एकूण प्रतिसेकंद 11313 क्युसेक्स पाणी पूर्वेकडे कोयना नदीपात्रात सोडण्यात येत आहे. त्याचवेळी धरणात प्रतिसेकंद येणाऱ्या पाण्याचे प्रमाण सरासरी 31 हजार 37 क्युसेक्स इतके आहे.चौकटदरम्यान, तीन दिवसानंतर मुळगाव पुलावरील पुराचे पाणी ओसरल्यानंतर पुलाच्या लगत असणारे भलेमोठे झाड उन्मळून पडल्याने पुलावरील वाहतूक ठप्प झाली होती. बांधकाम विभागाने सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास जेसीबीच्या सहाय्याने हे भलेमोेठे झाड बाजूला केल्यानंतर पुलावरील वाहतूक सुरळीत झाली.