सरकारी नोकरी करू इच्छिणाऱ्यांना वेगवेगळ्या पदासांठी वेगवेगळ्या परीक्षा द्याव्या लागतात. हा प्रकार आता थांबणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत या संदर्भात एक महत्त्वाचा निर्णय झाला. या निर्णयानुसार ज्या सरकारी नोकऱ्यांसाठी लेखी परीक्षेचे बंधन आहे अशा सर्व नोकऱ्यांसाठी फक्त एक परीक्षा (Common Eligibility Test – CET) घेतली जाईल. यामुळे सततच्या परीक्षांच्या ताणातून विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळेल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत सर्व सरकारी नोकऱ्यांसाठी फक्त एक परीक्षा घेण्याचा निर्णय झाला, अशी माहिती केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली. परीक्षा घेऊन सरकारी सेवेत नियुक्ती करण्यासाठी केंद्र सरकार राष्ट्रीय नियुक्ती संस्थेची (National Recruitment Agency – NRA) स्थापना करणार आहे. ही संस्था सरकारी नोकऱ्यांसाठी लेखी परीक्षा घेईल. लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्यांना पात्रतेचे इतर सरकारी निकष पूर्ण केल्यास सरकारी सेवेत नोकरीची संधी मिळेल.स्पर्धा परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यापासून ३ वर्षांपर्यंत या निकाला आधारे नोकरीसाठी अर्ज करता येईल, असाही एक निर्णय मंत्रिमंडळाने घेतला.