महाराष्ट्र न्युज प्रतिनिधी फलटण
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली 19 ऑगस्ट रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली.त्यामध्ये शेतकर्यांच्या हिताचे दोन निर्णय घेण्यात आले आहेत.
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने ऊसाच्या एफआरपीमध्ये ( FRP) दहा रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे एक क्विंटल ऊसासाठी २८५ रुपये एवढा एफआरपी (रास्त आणि लाभदायी दर) मिळेल. ऊसाची एफआरपी १० टक्के रिकव्हरीवर आधारीत आहे. जर रिकव्हरी ९.५ टक्के असेल तर एक क्विंटल ऊसासाठी २७० रुपये एवढा एफआरपी मिळेल.
मागच्या वर्षीपेक्षा जास्त इथेनॉल खरेदी करणार
तसेच ऊसाच्या मळीपासून तयार होणारे इथेनॉल पेट्रोल आणि डिझेल सोबत मिसळून नियंत्रित दराने देशात इंधन उपलब्ध करुन दिले जाते. मागच्यावर्षी या प्रक्रियेसाठी केंद्र सरकारने १९० कोटी लिटर इथेनॉल खरेदी केले होते. यंदा १९० कोटी लिटरपेक्षा जास्त इथेनॉल खरेदी करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. या निर्णयाचा मोठा फायदा साखर कारखानदारांना होणार आहे. इथेनॉलला चांगला दर मिळणार असल्यामुळे साखर कारखानदार त्यांच्या अधिकारात निश्चित करणार असलेला ऊसाचा दर शेतकऱ्यांसाठी आणखी लाभदायी ठरणार आहे.
































