चालक व मालक यांच्यावर गुन्हा दाखल ; सात लाख वीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी / खटाव :
खटाव तालुक्यातील मौजे मांडवे गावच्या बस स्टँडच्या समोर दिनांक 2 रोजी रात्री दोनच्या सुमारास वडूज पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मालोजीराव देशमुख यांनी पोलिसांना नाकाबंदी करणेबाबत सूचना दिली. सदर नाकाबंदी चालू असताना एक हिरव्या रंगाचा एल पी मॉडेलचा ट्रक भरधाव वेगाने येत असताना दिसला. सदर ट्रक थांबवून पाहणी केली असता त्यामध्ये वाळू असल्याचे दिसून आले. वाहतुकीबाबत कोणता परवाना असल्याची विचारणा केली असता चालकाने कोणताही परवाना नसल्याचे सांगितले.
पोलिसांनी तत्काळ सदर ट्रक क्र एम एच 43 U 7347 व चालक वडूज पोलीस ठाणे येथे आणून ट्रकच्या मालका बाबत विचारणा केली असता चालकाने मालकाचे नाव सांगितले. त्यानंतर पोलिसांनी चालक भीमराव गुलाब खाडे व मालक सागर हिंदू ठोंबरे (दोघेही रा. पळशी ता. माण) त्यांच्यावर गुन्हा दाखल करून एलपी मॉडेलचा ट्रक व चार ब्रास वाळू असा एकूण सात लाख वीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पुढील तपास पोलिस करीत आहेत.































