महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी : शहाजीराजे भोसले (कळंब – इंदापूर)
केंद्र सरकारकडून साखर उद्योगाला मदती संदर्भात आठवडाभरात निर्णय होणार आहेत . सध्या अडचणीत असलेल्या साखर उद्योगाला मदत करण्याची केंद्र सरकारची भूमिका आहे , अशी माहिती भाजपचे नेते व राज्याचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी शुक्रवार , दि. २८ ऑगस्ट रोजी दिली .
नवी दिल्ली येथे केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर आणि केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण खात्याचे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना महाराष्ट्रातील साखर उद्योगाचे शिष्टमंडळ भेटले . यावेळी केंद्रीय मंत्री महोदयांसमवेत झालेल्या बैठकीत माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील , माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केंद्र सरकारकडून साखर उद्योगाच्या मदती संदर्भात विविध मागण्या करून , सविस्तरपणे चर्चा केली व आपली भूमिका मांडली . तसेच मदती संदर्भातील धोरणात्मक निर्णय लवकर घेतले जावेत , अशी विनंती केल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले .
गेली दोन-तीन वर्षातील दुष्काळी परिस्थितीमुळे आणि उस दर व साखरेची विक्री किंमत यामधील तफावतीमुळे साखर कारखाने आर्थिक अडचणीत सापडले आहेत . त्यामुळे साखर कारखान्यांकडील कर्जाचे वन टाइम पुनर्गठन करावे , साखरेचा बफर स्टॉक वाढवून द्यावा , कारखान्यांना साखर निर्यातीचे अनुदान द्यावे , सॉफ्ट लोन उपलब्ध करून द्यावे तसेच सुमारे २० हजार कोटी रुपयांचे अनुदानाचे बेल आऊट पॅकेज द्यावे आदी मागण्या या बैठकीमध्ये केंद्र सरकारकडे करण्यात आल्या . सदरच्या मागण्यांवर केंद्र सरकार सकारात्मक असून निर्णय घेणेसाठी पुढील आठवड्यामध्ये बैठक आयोजित करण्यात येईल , अशी माहिती मंत्रीमहोदयांनी बैठकीत शिष्टमंडळाला दिली असल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले . केंद्रीय मंत्री गटाचे अध्यक्ष व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे साखर उद्योगाला मदत करण्याच्या मानसिकतेत आहेत , त्यामुळे पुढील आठवड्यात होणाऱ्या बैठकीत केंद्र सरकारकडून साखर उद्योगासाठी चांगले निर्णय जाहीर होतील , अशी माहिती हर्षवर्धन पाटील यांनी दिली .
सदरच्या शिष्टमंडळांमध्ये माजी मंत्री हर्षवर्धन पाटील , राधाकृष्ण विखे पाटील तसेच आ.राहुल कुल , आ.रणजितसिंह मोहिते पाटील , धनंजय महाडीक , पृथ्वीराज देशमुख , कल्याणराव काळे यांचा समावेश होता .