कोरोनाचे गंभीर होत चाललेले संकट लक्षात घेऊन २५ लाख विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि सुरक्षा टांगणीला लावणाऱ्या राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (नीट) तसेच संयुक्त प्रवेश परीक्षा (जेईई) स्थगित करण्यात याव्या, अशी मागणी शुक्रवारी महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, राजस्थान, पंजाब, झारखंड, छत्तीसगढ आणि पुद्दुचेरी या सात राज्यांनी केली. नीट आणि जेईईच्या परीक्षांचे व्यवस्थित आयोजन करण्यात आलेले नसून त्यामुळे २५ लाख विद्यार्थीच नव्हे तर त्यांच्या कुटुंबांचे आरोग्य या संकटात सापडणार असल्याचा दावा काँग्रेस, शिवसेना, तृणमूल काँग्रेस आणि झारखंड मुक्ती मोर्चाच्या वतीने संयुक्त पत्रकार परिषदेत करण्यात आला.
सर्वोच्च न्यायालयात नीट आणि जेईईच्या परीक्षा स्थगित करण्यासाठी पुनर्विचार याचिका दाखल केल्यानंतर, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, तृणमूल काँग्रेसचे राज्यसभेतील नेते डेरेक ओब्रायन आणि काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते व ज्येष्ठ विधिज्ञ अभिषेक मनु सिंघवी यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांना ही माहिती दिली. हा मुद्दा राजकारणाबाहेरचा, विद्यार्थ्यांशी संबंधित आहे. नीट आणि जेईईच्या परीक्षा रद्द करू नयेत, तर पुढे ढकलण्यात याव्या आणि त्याचबरोबर शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये यासाठी तोडगा काढण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली. पुनर्विचार याचिका करणाऱ्या सात राज्यांमध्ये भारताची तीस टक्के लोकसंख्या आणि देशाचे ३० टक्के क्षेत्रफळ आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. या परीक्षांचे घाईघाईने आयोजन केल्यास २५ लाख विद्यार्थीच नव्हे तर त्यांचे पालक आणि कुटुंबियांनाही झळ बसू शकते. कारण केंद्र सरकारचे नियोजन ढिसाळ आहे. पण चार तासांच्या पूर्वसूचनेवर देशात लॉकडाऊन जाहीर करणाऱ्या सरकारकडून आणखी वेगळी अपेक्षा करता येणार नाही, अशी टीका ओब्रायन यांनी यावेळी केली.
अनलॉकच्या काळातही देशभरातील शाळा आणि कॉलेजे संपूर्णपणे बंद आहेत. या परीक्षा स्थगित व्हाव्या, रद्द होऊ नयेत, जानेवारीत शैक्षणिक वर्ष सुरू करूनही वर्ष वाचवू शकते, असा पर्याय आम्ही सर्वोच्च न्यायालयापुढे ठेवला आहे. २५ लाख विद्यार्थ्यांकडून करोना संसर्ग किती पटींनी वाढेल याची कल्पना करता येत नाही, शिवाय नीट आणि जेईईच्या परीक्षेतून अनेक विद्यार्थी वगळले जातील, कारण अनेकांना परीक्षा केंद्रांपर्यंत पोहोचणे शक्य होणार नाही. करो शहरी, निमशहरी आणि ग्रामीण भागातून परीक्षेसाठी येण्या-जाण्याचे नियोजन नाही. क्लॅटची परीक्षा स्थगित होऊ शकते, तर त्यापेक्षा अनेकपटींनी जास्त विद्यार्थी असलेल्या नीट आणि जेईईची परीक्षा का स्थगित होऊ शकत नाही, असा सवाल सिंघवी यांनी केला.