खा. उदयनराजेंनी शब्द पाळला : सातारा पालिका सभेत झाला ठराव
सातारा : सातारा जिल्ह्यातील पत्रकारांनी गेली अनेक वर्षे पाहिलेले सातारा जिल्हा पत्रकार भवनाचे स्वप्न अखेर साकारले आहे. 6 जानेवारी पत्रकार दिनी सातारा जिल्हा पत्रकार संघाने जिल्हा माहिती कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात जिल्हा पत्रकार भवनाबाबत निर्णायक पावले उचलल्यानंतर खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी हाकेला साद दिली आणि सातार्यात मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या गोडोली येथील साई मंदिरानजिक सातारा नगरपालिकेने बांधलेल्या इमारतीला जिल्हा पत्रकार भवन व साहित्य सदन असे नाव देण्याचा ठराव प्रशासकीय सभेत घेतला. सर्व प्रक्रिया पूर्ण करुन कोरोनानंतर धुमधडाक्यात जिल्हा पत्रकार भवन व साहित्य सदनाचे उद्घाटन केले जाणार असल्याची माहिती सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीष पाटणे व सातारा पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी दिली.
सातारा जिल्ह्यात जिल्हा पत्रकार भवन अस्तित्वात नव्हते. गेली अनेक वर्षे जिल्हा पत्रकार भवन व्हावे यासाठी नुसत्या चर्चा झडत होत्या. प्रत्यक्ष जिल्हा पत्रकार भवन आकाराला येत नव्हते. शहरातील प्रशासकीय जागांची पाहणीही यापूर्वीही अनेकदा पत्रकार भवनासाठी करण्यात आली होती. मात्र तांत्रिक अडचणींमुळे जागाही उपलब्ध झाली नाही. यावर्षीच्या 6 जानेवारीला पत्रकार दिनी जिल्हा माहिती कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात यासदंर्भात कृतियुक्त पावले टाकण्याचा निर्णय जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीष पाटणे, सातारा पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी, जिल्हा पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष शरद काटकर, सरचिटणीस दिपक प्रभावळकर, परिषदेचे प्रतिनिधी सुजित आंबेकर, प्रसिध्दी प्रमुख दिपक शिंदे, ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत कात्रे, जीवनधर चव्हाण, गजानन चेणगे, संदीप कुलकर्णी, इलेक्ट्रॉनिक मिडियाचे तुषार तपासे, ओंकार कदम, सोशल मिडियाचे अध्यक्ष सनी शिंदे व समस्त पत्रकारांच्या उपस्थितीत घेण्यात आला. जिल्हा पत्रकार भवनाबाबतच्या निर्णयाचे सर्वाधिकार याच कार्यक्रमात सर्वानुमते हरीष पाटणे आणि विनोद कुलकर्णी यांना देण्यात आले. पाटणे आणि कुलकर्णी यांनी कार्यक्रमानंतर लगेचच सातारा पालिकेचे मुख्याधिकारी अभिजीत बापट यांच्याकडे जिल्हा पत्रकार भवनासाठी इमारतीची मागणी केली. खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी तातडीने त्यात लक्ष घातले. पत्रकार दिनीच शुभेच्छा देताना ‘मीच तुम्हाला जिल्हा पत्रकार भवन देतो,’ असे त्यांनी सांगून टाकले. यासंदर्भात तातडीने इमारतीचा शोध घेण्याची सुचना त्यांनी नगरसेवक अॅड. डी. जी. बनकर व उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांना दिली.
त्यानुसार सातारा शहरात मध्यवर्ती ठिकाणी संपूर्ण जिल्ह्यातील अकराही तालुक्यातून व जिल्ह्याबाहेरुनही येणार्या पत्रकारांसाठी सोयीचे ठिकाण ठरेल अशी गोडोली येथील साई मंदिरालगत असलेली सातारा नगरपालिकेने नुकतीच बांधून ठेवलेली इमारत जिल्हा पत्रकार भवनासाठी सुचवण्यात आली. चार मजली असलेल्या या इमारतीचा काही भाग साहित्य परिषदेलाही देण्यात यावा अशी मागणी साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेनेही केली. त्यानुसार या इमारतीला ‘जिल्हा पत्रकार भवन’ व ‘साहित्य सदन’ असे नाव देण्याचा ठराव सोमवारी सातारा नगरपालिकेच्या प्रशासकीय सभेत मंजूर करण्यात आला.
मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या या इमारतीच्या सर्वात वरच्या मजल्यावर पत्रकारांच्या निवासाची व्यवस्था, त्याखालच्या मजल्यावर पत्रकारांचे कार्यक्रम व पत्रकार परिषदा यासाठी हॉल, त्याखालच्या मजल्यावर सुसज्ज ग्रंथालय व तळमजल्यावर साहित्य परिषदेच्या उपक्रमांसाठी हॉल अशी रचना ठरवण्यात आली आहे. खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांना ही संकल्पना कमालीची भावली असून त्यांनीही याबाबतच्या प्रक्रिया अपूर्ण असतील तर तातडीने पूर्ण करण्याच्या सुचना दिल्या आहेत.
सध्या कोरोनाचा कालावधी आहे. कोरोनाचा कालावधी संपताच व इमारतीची रंगरंगोटी, सुशोभिकरण, निवास व्यवस्था व अन्य बाबींची पूर्तता करुन लवकरच धुमधडाक्यात सातारा जिल्हा पत्रकार भवन व साहित्य सदन या इमारतीचे उद्घाटन व पत्रकारार्पण केले जाईल, अशी माहिती पाटणे व कुलकर्णी यांनी दिली.
जिल्ह्यातील पत्रकारांच्या उपयोगी पडलो याचे मोठे समाधान : खा. श्री. छ. उदयनराजे
सातारा जिल्ह्यातील पत्रकारांनी माझ्यावर जिवापाड प्रेम केले आहे. माझे व त्यांचे जिव्हाळ्याचे नाते आहे. सातारां जिल्हा पत्रकार भवनाचा प्रश्न अनेक वर्षे रेंगाळला होता. मला माहित होतं, पत्रकारांचा अनेकजण फक्त वापर करुन घेतात. पत्रकारांना देण्याची वेळ येते तेव्हा सर्वांची चुप्पी असते. माझे मात्र ओठात एक, पोटात एक असे काही नसते. माझ्या मित्रांनी मला जिल्ह्यातील पत्रकारांसाठी जिल्हा पत्रकार भवन मागितले आणि मी ते तातडीने देवू शकलो यातच फार मोठे समाधान आहे. लवकरच इमारतीतील अपुर्या बाबी पूर्ण करुन सुसज्ज असे जिल्हा पत्रकार भवन पत्रकारांच्या ताब्यात देवू, अशी प्रतिक्रिया खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केली आहे.
मराठी पत्रकार परिषदेने मला सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्षपद दिले. पत्रकारांची आंदोलने, सामाजिक उपक्रम, गोरगरीब पत्रकारांना मदत असे काम जिल्ह्यातील सहकार्यांच्या मदतीने आतापर्यंत आम्ही करत आलो आहोत. या सर्व वाटचालीत जिल्हा पत्रकार भवन नाही याची खंत मनाला सातत्याने बोचत होती. अध्यक्षपदाच्या कारकिर्दीतच सातारा जिल्हा पत्रकार भवन व्हावे हे आपले स्वप्न होते. संघटनेच्या पदाधिकार्यांसह सर्व सहकार्यांनी टाकलेल्या विश्वासाला खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी साथ दिली. त्यामुळे जिल्ह्यातील हजारो पत्रकारांचे स्वप्न साकारले जात आहे. माझ्या वैयक्तिक पत्रकारितेच्या संघटनात्मक वाटचालीत जिल्हा पत्रकार भवन ही कायमस्वरुपी नोंद राहिल याचा मला अभिमान आहे.
हरीष पाटणे अध्यक्ष, सातारा जिल्हा पत्रकार संघ
6 जानेवारीला पत्रकार दिनी सातार्यात जिल्हा पत्रकार भवन उभे करुन देण्याची जबाबदारी हरीष पाटणे व माझ्यावर सहकार्यांनी टाकली होती. याबाबत आम्ही तातडीने पावले उचलली. खा. श्री. छ. उदयनराजे भोसले, उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, नगरसेवक अॅड. डी. जी. बनकर, सातारा पालिकेचे प्रशासक व मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी आम्ही त्याच दिवशी दिलेल्या अर्जावर विचार केला. नगरपालिका सभेत ठराव करुन ही इमारत जिल्हा पत्रकार भवन व साहित्य सदन म्हणून पत्रकारिता व साहित्यविषयक उपक्रमांसाठी आम्हाला दिली जात असल्याचा निश्चितपणे आनंद व अभिमान वाटतो. सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीष पाटणे यांनी जे स्वप्न पाहिले होते ते पूर्ण करण्यात त्यांचा मित्र म्हणून मला कृतीयुक्त सहभाग नोंदवता आला याचा अभिमान वाटतो.
विनोद कुलकर्णी
अध्यक्ष सातारा पत्रकार संघ
अध्यक्ष, साहित्य परिषद शाखा (शाहूपुरी)