भाजपाच्या उंब्रज कार्यालयात बैठक : उत्तरमधील पक्षाच्या वरिष्ठ नेते, कार्यकर्त्यांची उपस्थिती
कराड/प्रतिनिधी :
राज्यभरात भाजपच्या विरोधात महाविकास आघाडीमधील सर्व घटक पक्षांनी विविध स्तरावरील निवडणुका एकत्रितपणे लढवण्याचे जाहीर केले आहे. नुकत्याच झालेल्या पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत भाजपविरोधात महाविकास आघाडीने दिलेल्या एकत्रित लढतीमुळे त्यांना यश मिळाले. परंतु, आता परिवर्तनासाठी संघर्षाची भूमिका घेत कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुका भाजपच्या माध्यमातून पूर्ण ताकतीने लढवण्याचा निर्धार मान खटाव अँग्रो साखर कारखान्याचे को. चेअरमन व जिल्हा परिषद सदस्य मनोज घोरपडे यांनी व्यक्त केला.
उंब्रज येथील भाजपच्या पक्ष कार्यालयात शनिवारी 5 रोजी आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी कराड उत्तर भाजपाचे अध्यक्ष महेश जाधव, विशाल शेजवळ, सुरेशतात्या पाटील, महेंद्रकुमार डुबल, हरीश पाटील, जयवंत जगदाळे, दिनकर पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती.
उत्तरचे नेते मनोज घोरपडे म्हणाले, कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे याठिकाणी सर्व ग्रामपंचायतीत भाजपच्या माध्यमातून स्वतंत्र पॅनेल टाकून निवडणूका लढविण्यात येणार आहेत. तशा प्रकारच्या सूचना पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून देण्यात आल्या असून त्यादृष्टीने मोर्चेबांधणी करण्यासही सुरुवात करण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, कराड उत्तरमधील ग्रामपंचायत निवडणुका भाजपच्या माध्यमातून लढवण्याच्या निर्णयाचे स्वागत सातारा जिल्हा सैनिक आघाडीच्या वतीने करण्यात आले.