महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी शहाजीराजे भोसले(कळंब – इंदापूर)
गाडी चालकाचा ताबा सुटल्याने ३२ वर्षीय युवकाचा मृत्यू
कळंब ( ता. इंदापूर ) येथील अशोकनगर येथे ३२ वर्षीय युवकाचा चारचाकी गाडीची धडक बसल्याने मृत्यू झाला.
चौघे मित्र रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास कळंब येथील अशोकनगरकडे जाणारे रस्त्यालगत बंद घरासमोर गप्पा मारत बसले होते. त्यावेळी कार चालक वालचंदनगर-कळंब रस्त्यावरून गाडी वळवून अशोकनगरच्या रस्त्याने चालला होता.
त्यावेळी गाडीवरील ताबा सुटल्याने गणेश अविनाश लाळगे, प्रशांत बनसोडे, राजेश खंडागळे व सागर ढोबळे हे चौघे मित्र गप्पा मारत बसले होते, त्यांच्या दिशेने रस्ता सोडून गाडी येत असल्याचे पाहून हे मित्र वाट दिसेल तिकडे धावले. परंतु दुर्दैवाने गणेश लाळगे याला गाडीची जोरात धडक बसली व तो गंभीर जखमी झाला. गणेश यास तातडीने बारामती येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.