महाराष्ट्र न्यूज मुळगाव प्रतिनिधी : बेकायदेशीररित्या गावठी पिस्टल बाळगल्याप्रकरणी चाफळ विभागातील जंगलवाडी, ता. पाटण येथील जोतीराम उर्फ सागर दत्तात्रय शितोळे (वय 26 वर्ष) या युवकाला पाटण पोलिसांनी नवीन बसस्थानक परिसरात सापळा रचून ताब्यात घेतले.
त्याच्यावर पाटण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला पाटण न्यायालयासमोर हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती सपोनि चंद्रकांत माळी यांनी दिली.याबाबत पाटण पोलिसांनी दिलेली माहिती अशी, बेकायदेशीर रित्या पिस्तुल घेवून एक युवक शुक्रवार दि. 17 रोजी पाटण येथे येणार असल्याची गोपनिय माहिती पाटणचे उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक थोरात यांना मिळाली होती. त्यांच्या मार्गदर्शनानुसार पाटणचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत माळी, पोलीस हवालदार राजेंद्र पगडे, मुकेश मोरे, अजित पवार, उमेश मोरे, प्रशांत माने या पथकाने पाटण येथील नवीन बसस्थानक परिसरात सापळा लावला होता.
सदर युवक हा पाटण येथील नियत बारनजीक सायंकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास आला असता त्याच्यावर तात्काळ पाटण पोलिसांनी झडप घालून ताब्यात घेतले. त्याच्याकडून पोलिसांनी गावठी बनावटीचे पिस्टलसह 3 जीवंत काडतुसही जप्त केले असून त्याच्यावर पाटण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी त्याला पाटण न्यायालयासमोर हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.दरम्यान, सदर युवकावर यापूर्वी चोरीचे गुन्हेही दाखल असून तो रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे.
दोन ते तीन वर्षापूर्वी बिहार येथील एका व्यक्तीकडून हे पिस्तुल त्याने खरेदी केले होते. गावात विरोधक जास्त असल्याने स्वत:च्या संरक्षणासाठी ही पिस्तुल तो स्वत:जवळ बाळगत असल्याची माहिती सदर युवकाने दिली असल्याचे पोलिसांनी यावेळी सांगितले. याचा अधिक तपास सपोनि चंद्रकांत माळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक पी. व्ही. पाटील करत आहेत.