यावेळी सुरू होणारे पावसाळी अधिवेशन अध्यक्षांविना पार पडेल, असे होण्याची महाराष्ट्राच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ आहे. कोरोनाची लागण झाल्याने विधानसभा अध्यक्ष नाना पटोले उपस्थित राहणार नाहीत.केवळ दोन दिवस चालणारे हे अधिवेशन अध्यक्षांच्या अनुपस्थितीत विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोमवारपासून दोन दिवसांचे पावसाळी अधिवेशन घेण्यात येणार आहे. कोरोनाचे संकट लक्षात घेता या अधिवेशनाला येणार्या प्रत्येक आमदाराला मास्क, फेस शील्ड, सॅनिटायझर, हॅन्डग्लोज असे साहित्य दिले जाणार आहे. अधिवेशनाच्या दोन्ही दिवशी सर्वांनी हॅन्डग्लोज, मास्क लावून फिरले पाहिजे. फेस शील्ड देखील बंधनकारक करण्यात आले आहे. कोरोनामुळे एकत्र येण्याला बंधने आहेत. त्यामुळे सरकारच्या वतीने होणारा चहा पानाचा कार्यक्रम देखील रद्द करण्यात आला आहे.कोरोना आणि राज्यातील कायदा सुव्यवस्था लक्षात घेता हे अधिवेशन घेण्याचा अट्टाहास केला जातोय, असा आरोप विरोधक करत आहेत. तसेच कोरोनाच्या संसर्गामुळे अनेकांचा मृत्यू झाला, तरीही शासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे विरोधी पक्ष कोरोना, कायदा सुव्यवस्था, शेती, शिक्षण या विषयावर विरोधी पक्ष सरकारला जाब विचारणार असल्याचे सांगितले जात आहे.
अधिवेशन कालावधी केवळ दोन दिवसांचा असल्याने या अधिवेशनात प्रश्नोत्तरे आणि लक्षवेधी नाहीत. यावेळी अधिवेशनात पहिल्या दिवशी दिवंगत माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी, माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर आणि काही सदस्यांच्या निधनाचे शोक प्रस्ताव चर्चेला येणार आहेत. त्यानंतर सरकारच्या वतीने काही विधेयके मांडली जाणार आहेत. तसेच आर्थिक बिले पास करण्यासाठी अधिवेशन घेण्यात येत असल्याचे सत्ताधारी म्हणत आहेत.