पुणे : आरबीएल बँकेकडून प्रतिबंधक हेल्थकेअर सीएसआर उपक्रमांतर्गत पुणे, पिंपरी-चिंचवड आणि नागपूर येथील महानगरपालिका आणि ग्रामीण समित्यांना पाच मोबाइल वैद्यकीय व्हॅन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या विशेष प्रयत्नांमुळे या व्हॅन उपलब्ध झाल्या आहेत.
या मोबाइल मेडिकल व्हॅन पुणे महानगरपालिका, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, बारामती गाव समिती, सासवड गाव समिती आणि नागपूर महानगरपालिका अंतर्गत कोरोना प्रभावित भागात एक महिन्यासाठी उपलब्ध असतील.
कोरोना प्रतिबंधित क्षेत्र व ग्रामीण भागात राहणारे लोक त्यांच्या स्थानिक दवाखान्यात जाऊ शकत नाहीत. या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी आरबीएल बँकेने महाराष्ट्र सरकारच्या सहकार्याने मोबाईल मेडिकल व्हॅन तैनात करण्याचा निर्णय घेतला. या भागात मोबाइल क्लिनिक म्हणून या व्हॅन काम करतील.दररोज किमान १०० रुग्ण किंवा त्याहून अधिक तपासणी करण्याची क्षमता असून कोरोना पॉझिटिव्ह शोधणे आणि इतर वैद्यकीय आवश्यकता पूर्ण करण्यासाठी वैद्यकीय व्हॅनची मदत होईल.
व्हॅनमध्ये डॉक्टर, सहाय्यक कर्मचारी आणि औषधे तसेच हँड सॅनिटायझर्स, पीपीई किट, स्टेथोस्कोप, इन्फ्रा-गन, रक्तदाब कफ किंवा बीपीएम, कपड्याचे मुखवटे, ऑक्सिमीटर, ड्रेसिंग मटेरियल आणि ग्लूकोमीटर या सुविधांनी सज्ज आहेत. उपचार आणि औषधे दोन्ही मोफत दिले जातील. सामाजिक अंतर आणि स्वच्छतेच्या निकषांचे काटेकोरपणे पालन केले जाईल.
बारामतीमध्ये आरबीएल बँक आणि ग्लोबल शापर्स यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक आर्थिक मंचाचा एक उपक्रम म्हणून महिला आणि तरुण मुलींना विनामूल्य सॅनिटरी पॅड आणि मास्कदेखील वितरीत करणार आहेत. आरबीएल बँकेच्या स्वयंसेवी संस्थांद्वारे फेस मास्कचे उत्पादन आणि वितरण, कर्मचाऱ्यांना पेरोल गिव्हिंग प्रोग्राम, प्रवासी समुदायांसाठी मदत कार्य आणि व्हर्च्युअल कर्मचारी स्वयंसेवक कार्यक्रम यासह इतर सहाय्यक उपक्रमांचा एक भाग आहे.
आरबीएल बँकेच्या एचआर, सीएसआर आणि अंतर्गत ब्रँडिंगच्या प्रमुख शांता वॅलरी गांधी म्हणाल्या, “आरबीएल बँकेचे ध्येय ‘कम्युनिटी इज द कॉज’ हे आहे. आम्ही एक सामाजिक जबाबदार संस्था आहोत आणि आव्हानात्मक काळात समुदायांना आधार देण्यावर विश्वास ठेवतो. कोरोना विरुद्ध लढा देणे ही काळाची गरज आहे.
साथरोगाविरूद्ध लढा देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारला सहकार्य करणे हे आमचे कर्तव्य आहे.
पुणे महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल म्हणाल्या, ‘‘ आरबीएल बँकेने पुणे, महाराष्ट्रात मोबाइल वैद्यकीय व्हॅन पुरवून कोविड मदत कार्यात पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल आम्हाला आनंद झाला आहे. जे आपत्कालीन परिस्थितीत उपचार आणि चाचणी घेऊ शकत नाहीत, अशा
वंचितांना विशेषत: गरीब लोकांसाठी साहाय्यभूत ठरेल.
आरबीएल बँकेच्या सीएसआरचा भाग म्हणून या कृतीचे आम्ही कौतुक करतो. सर्वांच्या मदतीने आपण एकत्रितपणे लढून कोरोनाविरूद्धची लढाई जिंकू, असा विश्वास आहे.